राज्यात दिवसाला दोघांचा मृत्यू

राज्यात दिवसाला दोघांचा मृत्यू

नाशिक - आरजे मलिष्काने मुंबईच्या खड्ड्यांवर "मुंबई तुला बीएमसीवर भरवसा नाय काय' सादर केलेल्या गाण्यावर भारतीय जनता पक्षाच्या गोटामध्ये राजकीय गुदगुल्या झाल्या होत्या. दुसरीकडे मात्र राज्यभरातील मृत्युचे सापळे बनलेल्या रस्त्यांची प्रकृती ठीक केली जात नाही. सरकारच्या आकडेवारीनुसार खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातात ठार होणाऱ्यांची संख्या दिवसाला सरासरी दोनच्या पुढे पोचलीय.

त्याविरोधात जनता रस्त्यावर उतरुनही निर्ढावलेली यंत्रणा डागडुजीचे नाव घेताना दिसत नाही. शिवाय टोल संपलेल्या भागात रस्त्याचा वाहन चालकांना शोध घ्यावा लागतो.

विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये 34 हजार 112 किलोमीटर राज्य, जिल्हा आणि इतर-जिल्हे रस्ते आहेत. त्यातील अमरावतीमध्ये 15 हजार 609, तर नागपूरमध्ये 18 हजार 503 किलोमीटरचे रस्ते आहेत.

सध्यस्थितीत साडेनऊ हजारांहून अधिक किलोमीटरच्या रस्त्यांची दुरवस्था झालीय. त्यांची डागडुजी करण्यासाठी जवळपास 3 हजार कोटी विदर्भाला आवश्‍यक असल्याचे तज्ज्ञ सांगतात. मराठवाड्यातील 65 हजार 686 किलोमीटर लांबीचे रस्ते असून रस्त्यांवरील खड्ड्यांमधून कसरत करत चालकांना वाहने चालवावी लागतात. त्यात औरंगाबादमधून जाणाऱ्या जालना, जळगाव, बीड रस्त्याचा समावेश आहे. जगप्रसिद्ध वेरुळ लेण्याकडे जाणाऱ्या रस्त्याप्रमाणेच नांदेड, बीड, परभणी, उस्मानाबादमधील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे.

उत्तर महाराष्ट्र खड्डेमय
जळगावमधील जिल्ह्यात अडीच हजार किलोमीटर लांबीचे रस्ते खराब आहेत. उर्वरित रस्त्यांवर खड्डे आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा खड्डेमय झाला आहे. सहा महिन्यापूर्वी 16 कोटींहून अधिक रकमेचे काम देण्यात आले असले, तरीही प्रत्यक्षात काम झालेले नाही. गेल्या 9 महिन्यात 317 अपघातांमध्ये 281 जणांचा मृत्यू झाला. नंदूरबार जिल्ह्यात खराब रस्त्यांनी 178 बळी घेतले आहेत. जिल्ह्यात 44 किलोमीटरचा महामार्ग, 616 किलोमीटरचा राज्यमार्ग आहे. पाचशे किलोमीटर रस्ते खराब झालेत. धुळे जिल्ह्यात रस्ते अपघातांचा प्रश्‍न बिकट बनला आहे. 7 हजार 316 किलोमीटरचे रस्ते आहेत. जानेवारी ते मे 2017 पर्यंत झालेल्या 131 अपघातात 154 जण ठार झालेत.

उत्पन्नाच्या अभावामुळे जिल्हा परिषद, महापालिका आणि नगरपालिकांनी खड्डे भरण्यासाठी फारशी तरतूद दिसत नाही. जिल्हा परिषदेसाठी 80 लाखांपर्यंत तुटपुंजा निधी मिळत असल्याने खड्डे बुजवण्याचा प्रश्‍न अनुत्तरीत राहणार आहे.

पुण्यात गांधीगिरी
पुणे जिल्ह्यात एकूण 19 हजार 98 किलोमीटरचे रस्ते आहेत. सर्व रस्त्यांच्या उभारणी, देखभाल-दुरुस्तीसाठी जवळपास 50 हजार कोटींपेक्षा अधिक निधी खर्च झाला. पण म्हणून रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्‍न सुटलेला नाही. अधिकाऱ्यांना गुलाबपुष्प देऊन गांधीगिरीचा मार्ग प्रश्‍नाकडे लक्ष वेधण्यासाठी स्विकारण्यात आला. खड्डे बुजविणे, खड्ड्यात वृक्षारोपण याही मार्गाचा अवलंब करण्यात आला.

नगरमध्ये बारमाही खड्डेयुक्त रस्ता
नगर जिल्ह्यात 10 हजार 212 किलोमीटर लांबीचे रस्ते डांबरी आहेत. तसेच राष्ट्रीय महामार्ग 660 किलोमीटरचे आहेत. नगरमधील दिल्लीगेटजवळील रस्त्यावर बारमाही खड्डे असतात. टेंभुर्णी ते नगरपर्यंतचा प्रवास खड्ड्यांमुळे साडेचार ते पाच तासांवरुन साडेसहा तासांपर्यंत पोचला आहे.

चौपदरीकरण रखडले
सोलापुर ते पुणे महामार्गावर खड्डे पडले आहेत. शिवाय सोलापूर ते नगर महामार्गाचे चौपदरीकरण रखडले आहे. जेऊर येथील पुलावर मोठे खड्डे पडल्याने सतत वाहतुक कोंडी होते. खड्ड्यांमुळे 140 जणांना जीव गमवावा लागला आहे. त्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सर्वसामान्यांनी एकत्र येऊन सोशल मीडियावर चळवळ सुरु केली आहे, असे नगर-करमाळा-टेंभुर्णी रस्ता विकास कृती समितीचे कार्याध्यक्ष व्ही. आर. गायकवाड यांनी सांगितले.

सांगलीत खड्ड्यात लावले दिवे
सांगली जिल्ह्यातील रस्त्यांची खड्ड्यांनी चाळण झाली. या खड्ड्यांमध्ये दिवे लावा आंदोलन दिवाळीच्या पूर्वसंध्येला झाले. स्वाभिमानी संघटनेचे नेते सतीश साखळकर यांच्या पुढाकाराने त्यासाठी सर्व पक्षीय रस्ते बचाव कृती समिती स्थापन करण्यात आली. जिल्ह्यात 11 हजार 945 किलोमीटर रस्ते आहेत. तीन वर्षात 2 हजार 173 अपघात झाले असून त्यात 1 हजार 171 जणांचा मृत्यू झाला.

कोल्हापूर-सांगली "डर्ट ट्रॅक'
कोल्हापूर ते सांगली रस्ता "डर्ट ट्रॅक' बनलाय. हेर्लेच्या अलीकडील पुलाजवळ वळताना रस्ता वरखाली असल्याने वाहनांवर नियंत्रण ठेवता येत नाही. मालेजवळ रस्त्याच्या दोन्ही बाजूला खड्डे असून चालक घाबरतात. रूकडीच्या अलीकडील पेट्रोल पंप, हातकणंगले पूल, रामलिंग व इचलकरंजी फाटा येथे रस्त्यावर खड्डेच खड्डे आहेत. शिरोली फाटा ते दानोळी फाट्यापर्यंतच्या रस्त्याची चाळण झाली आहे.

राज्यातील स्थिती
- राज्यात खड्ड्यांमुळे 2014 मध्ये 124, 2015 मध्ये 812 मृत्यू
- कणकवली-गगनबावडा-कोल्हापूर आणि राधानगरी-कणकवली-मालवण मार्गाची दुरावस्था
- वाशीगाव सिग्नल रस्त्यावर मुंबई दलातील पोलिसाचा मृत्यू
- नागपूर औद्योगिक वसाहत भागात खड्ड्यामुळे बारा वर्षाच्या मुलाचा मृत्यु
- द्रुतगती मार्गावर आढे गावाजवळ मोटार खड्ड्यात उलटून पुण्याचे दोन ठार
- वरोर-वाढवण रस्त्यात खड्ड्यात दुचाकी आदळून महिलेचा मृत्यु
- मुंबई-आग्रा महामार्गावर भिवंडीच्या जवळ असलेल्या खड्ड्यात आदळल्याने वाहनाचे फुटतात टायर

पंढरपूर भागातील पालखी मार्गाच्या 13 रस्त्यांच्या डागडुजीची एकच निविदा केली गेली. या देखभाल-दुरुस्तीस वर्षभराचा कालावधी होतो न होतो तोच नव्याने काम करण्यास यंत्रणा तयार झालीय. रस्त्यांची दुरुस्ती कितपत होते याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही.
- बाबूराव गायकवाड (सांगोला, जि. सोलापूर)

महामार्गांच्या दुरुस्तीसाठी सरकारने कंपनीबरोबर करार केला आहे. त्या कंपन्यांनी रस्त्यांची देखभाल दुरुस्तीचे काम करायला हवे. कंपन्यांकडून लोकांची फसवणूक सुरू आहे.
- पूजा निकम (सभापती-चिपळूण पंचायत समिती)

सांगली जिल्ह्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्ते निकृष्ट करुन नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळला जात आहे.
- सतीश साखळकर (समन्वयक, रस्ते बचाव कृती समिती)

नंदूरबार जिल्ह्यातील केवळ मोठे रस्तेच नाही, तर दुर्गम भागातील रस्त्यांकडेही लक्ष केंद्रित होणे आवश्‍यक आहे.
- भरत गावित (सदस्य, नंदूरबार जिल्हा परिषद)

नगर जिल्ह्यातील रस्त्यांची दुरवस्था आहे. शहरांमधील व्यापार वृद्धींगत करण्यासाठी रस्ते चांगले हवेत. आम्ही गावचा विकास करताना रस्त्याला प्राधान्य देणार आहोत.
- मच्छिंद्र कराळे (सरपंच, आगडगाव)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com