प्रसूती रजांच्या परिपत्रकासाठी 'एसटी'ला सात महिन्यांनंतर जाग

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 मार्च 2018

नाशिक - परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी ऑगस्ट 2017 मध्ये राज्य परिवहन महामंडळातील महिला कामगारांसाठी सहा महिने प्रसूती आणि तीन महिने अतिरिक्त रजेची घोषणा केली होती. पण त्यासंबंधीचे परिपत्रक जारी करण्यासाठी महामंडळाच्या प्रशासनाला सात महिन्यांचा कालावधी लागला. महामंडळाने स्वीकारलेल्या धोरणानुसार एक वर्षापेक्षाही कमी सेवा झालेल्यांसह इतर वाहकांना 180 दिवसांची प्रसूतीची आणि तीन महिन्यांची अतिरिक्त रजा मिळेल.

प्रसूतीसाठीची नऊ महिन्यांची रजा संपल्यानंतरही आवश्‍यकता भासल्यास वाहकांच्या खात्यावर जमा असणारी सरासरी वेतनावरील रजा वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केल्यानंतर उपयोगात आणता येईल. मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार प्रसूती रजेपैकी किती आणि कोणत्या कालावधीत रजा घ्यायची, याची मुभा संबंधित महिला वाहकांना देण्यात आली आहे. ही सुविधा दोन अपत्यांपर्यंत उपलब्ध असेल. सवलतीची नोंद विभागप्रमुखांकडून सेवापुस्तकात केली जाणार आहे. याशिवाय गरोदरपणात पहिल्या चार महिन्यांत वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे आणि वाहकांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना बैठेकाम देण्याचा निर्णय विभागीय स्तरावर घेण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले. महिला वाहकांना गरोदरपणात काही ठराविक महिन्यांपर्यंत सुरक्षित, सुस्थितीत मार्गावर कामगिरी देण्याचा निर्णय संबंधित आगार व्यवस्थापकांनी घ्यायचा आहे. परिपत्रकात या सूचनांची अंमलबजावणी महामंडळाच्या 12 जानेवारीला झालेल्या ठरावापासून केली जाणार आहे.

परिवहनमंत्र्यांनी महिला कर्मचाऱ्यांसाठी प्रसूती रजांची घोषणा केली होती. आता इतर लेखनिक आणि महिला कामगारांसाठी प्रसूती रजांचा विषय महामंडळाने गांभीर्याने घेण्याची आवश्‍यकता आहे.
- शीला नाईकवाडे, केंद्रीय उपाध्यक्षा, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना

Web Title: nashik maharashtra news delivery leave circular