एसीबीकडून खडसेंची दीड तास चौकशी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

नाशिक - राज्याचे माजी महसूलमंत्री व ज्येष्ठ भाजप नेते एकनाथ खडसे यांची आज दुपारी नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात सुमारे दीड तास चौकशी करण्यात आली. मात्र, खडसे यांची कोणत्या प्रकरणी चौकशी करण्यात आली, हे स्पष्ट होऊ शकले नाही. चौकशीनंतर कोणतीही प्रतिक्रिया न देता खडसे निघून गेले; परंतु जाता-जाता "सर्वांवर वाईट दिवस येतात...' असे हतबल वक्तव्य केले. 

राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे हे आज दुपारी साडेतीनच्या सुमारास जुन्या पोलिस आयुक्तालयासमोरील नाशिक विभागीय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात पोचले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले यांच्या दालनामध्ये एकनाथ खडसे यांची सुमारे दीड तास कसून चौकशी करण्यात आल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून समजते. चौकशी आटोपल्यानंतर खडसे यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देण्यासही नकार दिला. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले यांच्याकडेही चौकशीसंदर्भात विचारणा केली असता, त्यांनी सदरप्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. 

एकनाथ खडसे यांच्यावर हवालाप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गेल्या महिन्यात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने राज्य शासनाकडे विचारणा केली असता, त्या संदर्भात येत्या सोमवारी (ता.25) सुनावणी होणार असल्याचे सांगण्यात आले होते. नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे खडसे यांच्याविरोधात कोणतीही चौकशी नसली तरी जळगावच्या बांधकाम व्यावसायिकांच्या बॅंक खात्यातून मंदाकिनी खडसे यांच्या खात्यावर मोठ्या प्रमाणात आर्थिक रक्कम वळती झाल्याचे पुरावे दमानिया यांनी न्यायालयास दिले आहेत. त्या संदर्भातील चौकशी असण्याची शक्‍यता वर्तविली जाते आहे.

Web Title: nashik news eknath khadse ACB