पंतप्रधान मोदींचा निर्णय देशाला वेदना देणारा- पवार

वृत्तसंस्था
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

मुंबई : "मुंबई महानगरपालिकेत आता परिवर्तन करायचे आहेच. पण देशात आणि राज्यात आज जे चालू आहे ते असेच राहिले तर सामान्य माणसांचे जगणे मुश्‍किल होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला नोटबंदीचा निर्णय जनतेला पर्यायाने देशाला वेदना देणारा आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा- विधानसभा निवडणुकातही परिवर्तन करावे लागेल. त्यादृष्टीने ही परिवर्तन रॅली महत्त्वाची आहे,'' असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज येथे व्यक्‍त केले.

मुंबईतील घाटकोपर येथील मैदानावर आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने परिवर्तन रॅलीचे आयोजन केले होते. या वेळी त्यांनी पंतप्रधान मोदी, भाजप आदींवर जोरदार टीकास्त्र सोडले. पवार म्हणाले, ""आज सत्तेत बसलेले घटकांचे निर्णय देशाला, राज्याला, मुंबईकरांना यातना देणारे आहेत. मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्यांच्या यातना मी सांगायची गरज नाही. दळणवळणाची गाडी धावली पाहिजे; पण मुंबईकरांच्या यातना सरकारला दिसत नाहीत. त्यांना हवीय मुंबई-अहमदाबाद ट्रेन. तब्बल 98 हजार कोटी खर्च करून त्यांना अहमदाबादला जायची घाई लागली आहे. मुंबई लोकलवर आठ हजार कोटी खर्च केले तर मुंबईकरांचे प्रश्न सुटतील. मोदीजी देशाबाहेर जाऊन भारताच्या नेत्यांवर टीका करतात. याचा अर्थ भारताची बदनामी तुम्ही बाहेर जाऊन करता. इंदिरा गांधींनी असे कधीच केले नाही. पंतप्रधानांनी जगात जावे, भारताचे प्रश्न सोडवावेत आणि भारतीयांचा सन्मान ठेवावा; पण त्यांनी भारताचे प्रतिनिधी बनून जावे. भाजपचे प्रतिनिधी म्हणून जाऊ नये.''
नोटाबंदीच्या निर्णयामुळे भाजपचा सुपडासाफ होईल, असे भाकीत करीत पवार म्हणाले, ""चलन बंद केल्यामुळे देशात प्रचंड प्रगती होणार असल्याचे सांगितले जात आहे. सुरवातीला बरे वाटले; पण जसे दिवस सरकू लागले तसे ही भलतीच भानगड असल्याचे आता लक्षात यायला लागले आहे. बांधकाम मजुराला रोजची मजुरी दिली जाते, ती काय चेकने देणार का? त्याला जो पैसा मिळतो तो त्याच्या घामाचा पैसा असतो, तो काळा पैसा नसतो; पण हेच मजूर आज रांगेत उभे आहेत. सामान्य लोकांची दुखणी सरकारने वाढवली आहे आणि पंतप्रधान म्हणतात, काळ्या पैसेवाल्यांची झोप उडाली आहे. गुजरातमध्ये अमूल सर्वांत मोठी सहकारी संस्था आहे; पण तिथे शेतकऱ्यांना दुधाचे पैसे न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर ओतले, भाजीपाला फेकला. हे सरकारच्या नोटाबंदीमुळे झाले असल्याचेही पवार म्हणाले.
मोठ्या लोकांनी चुका केल्या असतील तर त्यांना फासावर चढवा; पण सामान्य, गरीब, निराधार माणसांच्या पैशाला काळा पैसा ठरवून त्यांना त्रास देऊ नका, असाही सल्ला पवार यांनी भाजपला या वेळी दिला.

Web Title: nation suffers with note ban decision