Mamata Banerjee : राष्ट्रगीत अवमान प्रकरणी याचिका फेटाळली; ममतांवरील खटला कायम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

National Anthem Contempt Petition Dismissed case against mamata banerjee

Mamata Banerjee : राष्ट्रगीत अवमान प्रकरणी याचिका फेटाळली; ममतांवरील खटला कायम

मुंबई : राष्ट्रगीताचा अवमान केल्या प्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेला आव्हान देणारी ममता बॅनर्जी यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळली. यामुळे बॅनर्जी यांच्यावरील खटला कायम राहणार आहे.

मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात १ डिसेंबर २०२१ रोजी झालेल्या सार्वजनिक कार्यक्रमाच्या शेवटी ममता बॅनर्जी यांनी बसून राष्ट्रगीत म्हणण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्या उभ्या राहिल्या आणि नंतर राष्ट्रगीताच्या दोन ओळी म्हणून कार्यक्रमातून निघून गेल्या.

या कार्यक्रमाची चित्रफीत समाजमांध्यमावर पाहिल्यानंतर मुंबई भाजपचे सचिव विवेकानंद गुप्ता यांनी कफ परेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली; परंतु पोलिसांनी त्यावर कोणतीही कारवाई न केल्याने त्यांनी शिवडी दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली आहे.

शिवडी दंडाधिकारी न्यायालयाने मागील वर्षी २ मार्चला बॅनर्जी यांना न्यायालयापुढे हजर राहण्याचे निर्देश दिले होते. या समन्सला बॅनर्जी यांनी ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ माजीद मेमन यांच्यामार्फत मुंबई सत्र न्यायालयात आव्हान दिले होते.

सत्र न्यायालयाने, समन्स रद्दबातल करण्याचे आदेश देऊन नव्याने यावर सुनावणी घेण्याचे निर्देश दंडाधिकारी न्यायालयाला दिले आहेत. या निर्णयाला बॅनर्जी यांनी उच्च न्यायालयात याचिकेद्वारे आव्हान दिले होते. सत्र न्यायालयाने मूळ तक्रार रद्दबातल न करता पुन्हा प्रकरण दंडाधिकारी न्यायालयात पाठवले. त्याऐवजी मूळ फिर्याद रद्दबातल करायला हवी, अशी मागणी बॅनर्जी यांनी आपल्या याचिकेत केली होती.

आज न्या. अमित बोरकर यांच्यासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. सत्र न्यायालयाने दिलेल्या निकालात काहीच बेकायदेशीर नाही, संबंधित निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णय प्रक्रियेनुसार दिसत आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. तसेच सत्र न्यायालयाने तक्रारीवर निर्णय दिलेला नाही असेही न्यायालयाने स्पष्ट केले आणि याचिका नामंजूर केली.

अडचणी वाढणार!

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राष्ट्रगीताचा अवमान प्रकरणात तपास करण्याचे आदेश शिवडी दंडाधिकारी न्यायालयाने कफ परेड पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे बॅनर्जी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. यावर पुढील सुनावणी २८ एप्रिल रोजी होणार असून पोलिसांना या वेळी अहवाल दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.