राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘राष्ट्रीय’ दर्जा धोक्‍यात

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 22 जुलै 2019

सध्या सात पक्ष राष्ट्रीय
राष्ट्रीय पक्षाच्या दर्जासाठी लोकसभेच्या चार जागा जिंकण्यासह चार किंवा त्याहून अधिक राज्यांमध्ये एकूण मतांच्या सहा टक्के मते पक्षाला मिळणे आवश्‍यक असते. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसला ही मते राखता आलेली नाहीत. सध्या भारतात भाजप, काँग्रेस, बहुजन समाज पक्ष, तृणमूल काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे सात राष्ट्रीय दर्जा असलेले पक्ष आहेत. राष्ट्रवादी, तृणमूल आणि भाकपचा दर्जा काढून घेतल्यास चारच राष्ट्रीय पक्ष देशात उरतील.

मुंबई - लोकसभेच्या सलग दोन निवडणुकांत झालेला पराभव आणि निवडणूक आयोगाच्या नियमानुसार पुरेशी मते मिळाली नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रीय पक्ष म्हणून मिळालेली मान्यता धोक्‍यात आली आहे.

१९९९ साली शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती. त्याच सालात झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाला भरघोस मतदान झाले होते. ‘राष्ट्रवादी’ने काँग्रेससोबत आघाडी करून केंद्र आणि राज्यात सत्ता स्थापन केली होती. २००४ आणि २००९ मध्ये झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही पक्षाने स्वतःचे अस्तित्व कायम राखले होते. प्रत्येक वेळी आठ किंवा नऊ खासदार आणि अन्य राज्यांतील विधानसभा निवडणुकीत ‘राष्ट्रवादी’चे आमदार निवडून आल्याने पक्षाला राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळाली होती. मात्र, २०१४ आणि २०१९ सालात झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाची जोरदार पीछेहाट झाली. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या कायद्यातील तरतुदीनुसार पक्षाला मतांचा टक्‍का राखता आला नाही. या पार्श्‍वभूमीवर तुमचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून का घेऊ नये, अशी नोटीसच निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीला बजावली आहे. तृणमूल काँग्रेस आणि भाकपलाही अशीच नोटीस पाठविण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The national standard of the Nationalist Congress is in danger