राष्ट्रवादीचे मौनव्रत आंदोलन सुरू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 ऑक्टोबर 2018

केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांमुळे देशाची आर्थिक, सामाजिक परिस्थिती खालावली असून सर्वच क्षेत्रात अपयशी ठरलेल्या आणि लोकशाही मुल्यांची पायमल्ली करणाऱ्या भाजप सरकारच्याविरोधात गांधी जयंती दिवशी आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने आज राज्यभर धरणे आणि मौनव्रत आंदोलन सुरु केले आहे. 

मुंबई- केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांमुळे देशाची आर्थिक, सामाजिक परिस्थिती खालावली असून सर्वच क्षेत्रात अपयशी ठरलेल्या आणि लोकशाही मुल्यांची पायमल्ली करणाऱ्या भाजप सरकारच्याविरोधात गांधी जयंती दिवशी आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने आज राज्यभर धरणे आणि मौनव्रत आंदोलन सुरु केले आहे. 

भाजपच्या प्रतिगामी धोरणांमुळे महात्मा गांधींनी मिळवून दिलेले स्वातंत्र्य, लोकशाही व संविधानिक सार्वभौमत्व धोक्यात आलेले आहे. त्यामुळे सरकारच्या विरोधात राष्ट्रवादीने आंदोलनाचे हत्यार उपसले असल्याचे सांगत आज गांधी जयंतीच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जंयत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर महात्मा गांधीजींच्या पुतळयाखाली बसून धरणे व मौनव्रत आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

मंत्रालयाजवळ महात्मा गांधीजींच्या पुतळयासमोर प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर आदी नेत्यांसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सकाळी 9 वाजल्यापासून मौनव्रत आंदोलन सुरू केले आहे ते दुपारी 12 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

तसेच, पुण्यातही राष्ट्रावादी काँग्रेसच्या मूक आंदोलनला सुरवात झाली आहे, पुणे स्टेशन परिसरातील महात्मा गांधी पुतळ्यासमोर खासदार सुप्रिया सुळे आणि वंदना चव्हाण यांच्या उपस्थितीत मूक आंदोलन सुरू आहे. अनेक राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत खासदार सुप्रिया सुळे यांचा आजपासून महाराष्ट्रव्यापी दौरा सुरू होत आहे, राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त पुणे स्टेशन येथील गांधीजींच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर त्याच ठिकाणी सरकारच्या वेगवेगळ्या चुकीच्या धोरणांचा निषेध करण्यात येईल, त्यानंतर त्या दौऱ्यासाठी रवाना होतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nationalist Congress Party Agitation start