राष्ट्रवादी कॉंग्रेस "सामना'च्या पाठीशी 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

मुंबई - महापालिका निवडणुकीत आचारसंहितेचे पालन व्हावे यासाठी शिवसेनेचे मुखपत्र "सामना' या दैनिकावर बंदी घालण्याची भाजपने केलेली मागणी योग्य नाही, अशी भूमिका घेत राष्ट्रवादी कॉंग्रेसने "सामना'वरील बंदीचा निषेध केला. लोकशाहीतल्या माध्यमांचा गळा घोटण्याचा भाजपचा हा प्रकार असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्‍ते नवाब मलिक यांनी गुरुवारी केली. 

भाजपची ही मागणी म्हणजे आणीबाणीसदृश स्थितीची सूचना देणारी असल्याचा टोलाही मलिक यांनी लगावला. राष्ट्रवादीभवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजप सरकार सत्तेत आल्यापासून माध्यमांची गळचेपी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याअगोदर एका हिंदी वृत्तवाहिनीचे प्रक्षेपण एक दिवस बंद करण्याचा निर्णय केंद्रातल्या सत्तेने घेतला होता. मात्र, त्यावरून टीकेची झोड उठल्यानंतर तो माघारी घेण्याची नामुष्की ओढावली होती. आताही राज्यातल्या भाजप सरकारला अशीच नामुष्की ओढावून घ्यावी लागेल, असा टोलही मलिक यांनी लगावला. 

जाहिरातींवर 500 कोटी खर्च 
भाजपने मुंबई महापालिका निवडणुकीत जाहिरातींवर तब्बल 500 कोटींहून अधिक रुपये खर्च केल्याचा आरोप मलिक यांनी केला. विविध प्रसारमाध्यमांत कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती देत असताना त्याखाली नियमानुसार प्रायोजकाचे नाव न देता भाजपने आचारसंहितेचा भंग केला आहे. याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

Web Title: Nawab Malik criticized on bjp