सरकार उलथविण्याचा नक्षलवाद्यांचा कट - परमबीर सिंह

सरकार उलथविण्याचा नक्षलवाद्यांचा कट - परमबीर सिंह

मुंबई - देशभरात हिंसक कारवाया करून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण करून केंद्र सरकार उलथवून लावण्याचा नक्षलवाद्यांचा कट शिजत होता. त्याचे भक्कम पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) परमबीर सिंह यांनी आज केला. तसेच पुणे पोलिसांनी कारवाई केलेल्या लेखक, वकील आणि विचारवंतांचे नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे धागेदोरे सापडल्याचेही त्यांनी सांगितले. 

नक्षलवाद्यांशी संबंधित म्हणून पुणे पोलिसांनी ऍड. सुधा भारद्वाज, कवी पी. वरवरा राव, गौतम नवलाखा, वकील अरुण फरेरा आणि वेर्नोन गोन्साल्विस यांना अटक केली होती. सर्वोच्च न्यायालयाने त्यांची कोठडी न देता त्यांना नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिले होते. नक्षलवाद्यांशी या व्यक्तींचा संबंध असल्याचे ठोस पुरावे पोलिसांकडे असल्याचे परमबीर सिंह यांनी महासंचालक कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. हे सर्व माओवाद्यांचे ओव्हरग्राउंड केडर आहेत. हे गट युद्धासारखी परिस्थिती निर्माण करण्यासाठी नेपाळमधून शस्त्रे खरेदी करण्याच्या प्रयत्नात होते. याबाबतची पत्रे पोलिसांच्या हाती लागल्याचे सांगून, एका पत्रात राजीव गांधींप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घातपात करण्याचा उल्लेख आहे, असे परमबीर सिंह यांनी सांगितले. छाप्यांमध्ये हजारो कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. त्यातून आरोपी माओवाद्यांच्या केंद्रीय समितीच्या संपर्कात होते हे स्पष्ट होते, असे त्यांनी नमूद केले. 

एल्गार परिषदेत दिलेल्या प्रक्षोभक भाषणांमागेही आरोपी असल्याचा संशय आहे. एल्गार परिषदेला नक्षलवाद्यांकडून 15 लाखांचा अर्थपुरवठा झाल्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. या वेळी एका पत्रातून कोरेगाव भीमामधील तरुणाच्या मृत्यूचे भांडवल करून हे प्रकरण आणखी चिघळवण्याच्या आशयाचे संभाषणही पत्रामार्फत झाल्याचे ते म्हणाले. प्राथमिक तपासात नक्षलवादी फ्रान्स आणि अमेरिकेतील काही गटांशी संबंधित आहेत. त्यांच्या पॅरिसमध्येही बैठका झाल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणातील सर्व महत्त्वाचे पुरावे आम्ही सर्वोच्च न्यायालयापुढे सादर करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

शस्त्रांसाठी आठ कोटींचे अंदाजपत्रक 
नक्षलवाद्यांच्या शस्त्रांसाठी वार्षिक आठ कोटींचे अंदाजपत्रक असल्याचे एका पत्रातून उघड झाले आहे. चार लाख काडतुसे आणि "एम-4' ग्रेनेड लॉंचर नेपाळमधून मागवण्यात येणार होते. या वेळी चिनी आणि रशियन शस्त्रांचे कॅटलॉग आरोपींच्या घरातून जप्त करण्यात आले आहे; तसेच जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) काही विद्यार्थांना दुर्गम भागातून छुपे प्रशिक्षण देण्याबाबतच्या संभाषणाचे पत्रही पोलिसांकडे सापडले आहे, अशी माहिती परमबीर सिंह यांनी दिली. 

अतिरिक्त पोलिस महासंचालक म्हणाले... 
- विचारवंतांचे नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे धागेदोरे. 
- हे सर्व माओवाद्यांचे ओव्हरग्राउंड केडर. 
- नेपाळमधून शस्त्रे खरेदी करण्याचा प्रयत्न. 
- फ्रान्स, अमेरिकेतील गटांशी नक्षलवाद्यांचा संबंध. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com