अरूणाताई :दुर्गाबाई व्हा...

अरूणाताई :दुर्गाबाई व्हा...

दरवर्षी होणारी साहित्य संमेलने कायम वादग्रस्त का होतात हा नेहमीच पडणारा प्रश्‍न. यावर्षी तर अभिव्यक्‍तीच्या सन्मानासाठी होणाऱ्या सोहोळ्यात अभिव्यक्‍ती स्वातंत्र्यालाच नख लावले गेले. नयनतारा सेहगल या वयोवृध्द लेखिकेला संमेलनाचे उदघाटन करण्याचे निमंत्रण दिले गेले. सन्मानपूर्वक निमंत्रण देताना त्या लेखिकेचा आपण आदर करतो आहोत हे आयोजकांना किंवा त्यांना हे नाव सुचवणाऱ्या महामंडळाला लक्षात आलेच असावे ही अपेक्षा. त्या आंग्ल भाषेत लिहितात, त्यांच्या निर्णयामुळे पुरस्कार वापसीची मोहिम सुरू झाली हे सर्वज्ञात आहे. ते साहित्य संमेलन आयोजित करणाऱ्या संबंधितांना माहित नाही असे मानणे शक्‍य नाही. साहित्याच्या मंचावर वेगवेगळे प्रवाह यावेत, त्यातील ज्ञानवृध्द प्रवाहांचा आदर केला जावा ही त्यामागची भावना असणार, असावी. नयनताराजींच्या काही भूमिका अमान्य आयोजकांना अमान्य असतील, तो त्यांच्या विचारस्वातंत्र्याचा भाग आहे. पण या भूमिका अमान्य होत्या तर त्यांना आमंत्रण देण्यापूर्वीच विचार करायला हवा होता. तो न करता निमंत्रण दिले गेले, त्यानंतर अचानक त्यांना येवू नका असे सांगणे शिष्टसंमत तर नाहीच शिवाय अभिव्यक्‍ती स्वातंत्र्याचा विरोध करणारे आहे. आमंत्रण रद्द करण्याच्या निर्णयावर टीकेची झोड उठते आहे. ती योग्य आहे. पण हा निर्णय नेमका कुणाचा हेही स्पष्ट झालेले नाही. महामंडळाचे प्रमुख श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी या निर्णयाला आपण जबाबदार नाही, तो यजमान संस्थेने घेतलेला निर्ण्य होता असे स्पष्ट केले. जोशी हे ग्रंथ आणि साहित्य व्यवहारातले तळमळीचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी यासंबंधात अनेक उपक्रम राबवले आहेत. ते वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून अभिव्यक्‍ती स्वातंत्र्याला पुढे नेणाऱ्या मोहिमा राबवत असतात. यजमान संस्थेने काढलेल्या पत्रकानुसार हा निर्णय जोशींना नागपुरला भेटून सांगण्यात आला अन् मग जाहीर झाला असे स्पष्ट केले आहे. तसेच असेल तर आपण या निर्णयास विरोध करतो असे ते म्हणाले होते काय? त्यांच्या या वक्‍तव्याचा अनादर केला गेला काय ते त्यांनी सांगावे. ते प्रतिनिधित्व करत असलेल्या विदर्भ साहित्य संघाने गेली कित्येक वर्षे विदर्भाच्या गावागावात तळमळीने रुजवलेल्या चळवळीचे फलस्वरूप असलेल्या यवतमाळ शाखेने या निमंत्रणवापसीला विरोध केला होता काय हे जाहीर करावे. असे निर्णय घेणे म्हणजे आयोजक संस्थेने तेथे सुरू ठेवलेल्या संमेलनाच्या तयारीला विरोध करणे ठरले असते अशी सामोपचारी भूमिका घेतली गेली काय ? तेही कळावे. गावागावात साहित्य चळवळ रूजविण्यात विदर्भ साहित्य संघाने केलेली धडपड ज्ञात असलेल्या प्रत्येकाला असा निर्णय का घेतला गेला असा प्रश्‍न पडला आहे. विदर्भ साहित्य संघ आणि श्रीपाद भालचंद्र जोशी यांचे काम माहित असलेल्या प्रत्येकालाच हे कोडे आहे. मतांचा जोगवा मागण्याचा प्रकार दूर सारत यावेळी मराठी सारस्वताने अध्यक्षाची एकमताने निवड केली आहे. यजमान घटकसंस्था या नात्याने या पुढाकाराबददल विसासंघ आणि डॉ. जोशी या दोघांचेही कौतुक झाले. ही कामगिरी खरोखर लक्षणीय आहे. त्यामुळेच हे ऐतिहासिक संमेलन यशस्वी होणे आवश्‍यक आहे. त्याला ग्रहण लागणे दुर्दैवी ठरेल. महामंडळाचे कार्यालयफिरत असते. ते आज विदर्भ साहित्य संघाकडे आहे. अन्य संस्थांनीही निमंत्रण रद्द का केले याबददलची भूमिका स्पष्ट करावी.संस्था साहित्य वर्तुळाचे पुढारीपण निभावतात. त्यांची परस्परांवरची चिखलफेक महाराष्ट्राने पाहिली आहे.तेंव्हा आजच्या ज्वलंत विषयात जबाबदारी झटकणेही साहित्यवर्तुळाला नको आहे, अन शांत बसणेही. 

आता विषय यवतमाळकरांचा. संस्थेने काढलेले पत्रक ग्राह्य धरले तर आंग्ल भाषेतील लेखिकेला बोलावल्याच्या निषेधात काही मंडळींनी संमेलन उधळून देण्याचा इशारा दिल्याने निमंत्रण रदद केल्याचे दिसते. खरे तर संमेलनाला विरोध करणाऱ्या संघटनेच्या नेत्यांच्या प्रमुखांना तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या गृहखात्याला हे सांगता आले असते. मनसेच्या स्थानिक शाखेने केलेली ही आगळीक आहे, ती मान्य नाही असा खुलासा साहित्याच्या प्रांताबददल मन:पूर्वक आस्था बाळगणाऱ्या पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी तातडीने केला आहे. हे पुरेसे बोलके आहे. गावातल्या भडंग कार्यकर्त्यांना आवरण्याची जबाबदारी त्यांनी या विषयात निश्‍चितच पार पाडली असती. गृहखात्याची जबाबदारी असणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही संमेलनाला कुणाला बोलवायचे हा अधिकार महामंडळाचा आहे असे स्पष्ट केले आहे. साहित्यसंमेलनासहित प्रत्येक कार्यक्रमाला संरक्षण देत अभिव्यक्‍तीस्वातंत्र्याचे रक्षण करणे ही त्यांची घटनात्मक जबाबदारी आहे, ती त्यांना पार पाडावी लागली असती. साहित्य संमेलनांना सरकार अनुदान देत असते. पण म्हणून त्या मंचावरून दिशादिग्दर्शन करण्याचा प्रकार महाराष्ट्रातील सुसंस्कृत राज्यकर्ते करीत नाहीत. दुर्गाबाई भागवत यांनी अध्यक्षीय भाषणात आणीबाणीवर टीका केली होती तसेच जयप्रकाश नारायण यांच्या प्रकृतीला आराम मिळो या प्रार्थनेसाठी उभे रहाण्याचे आवाहन केले होते तेंव्हा प्रेक्षकात बसलेले तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण उठून उभे राहिले होते.या दोन्ही व्यक्‍तीमत्वांची उंची आजही महाराष्ट्राच्या कौतुकाचा विषय आहे. आज ,चालू वादाच्या पार्श्‍वभूमीवर, जारी केलेल्या पत्रकातही मुख्यमंत्री कार्यालयाने साहित्याच्या मंचावरून वेगवेगळे प्रवाह मत व्यक्‍त करत असतात,सरकार त्या मतांकडे, मंथनाकडे सकारात्मक पहाते असा उल्लेख केलाच आहे. 

आता पूलाखालून एवढे पाणी वाहून गेल्यानंतर पुढे काय हा प्रश्‍न आहे. नयनतारा सहगल यांच्या न झालेल्या भाषणाचा मसूदा उपलब्ध झाला आहे. त्यांनी जे वक्‍तव्य केले आहे ते मननीय आहे. त्यातील काही विधाने काहींना पटणार नाहीत, पण त्यात हरकत ती काय ? त्या विधानांच्या विरोधाला हरकत नसावी, वरवंटे फिरवणे ही साहित्याची संस्कृती नाही. नक्षलसमर्थकांविषयी केलेल्या विधानासह अन्य जे पटले नसते त्याबददल वेगळी मते मांडता आली असती. नयनताराजींनीही त्या वक्‍तव्यांचा आदर केला असता. आणीबाणीच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या, नेहरू कुटुंबातील असतानाही तसा विरोध जाहीर करीत त्याची किंमत त्यांनी चुकवली आहे याचे स्मरण ठेवले तरी शंकेला जागा रहाणार नाही. मात्र या संबंधात कोणताही सूज्ञ विचार न करता आमंत्रणवापसी झाल्याने निमंत्रणवापसीचे सत्र सुरू झाले आहे. निमंत्रित यवतमाळला जाणार नाही अशी ठाम भूमिका घेत आहेत. हा बहिष्कार आहे.काही जणांनी आपण तेथे जावून आयोजकांच्या निर्णयाचा निषेध करू असे स्पष्ट केले आहे. संमेलनाच्या अध्यक्षांची भूमिका आता सर्वाधिक महत्वाची ठरेल. साहित्यसंमेलनाने याही बाबत दुर्दैवी प्रकार अनुभवले आहेत.आनंद यादव यांना समारोपाचे भाषण करू दिले गेले नाही. त्यावेळी दंडेली झाली. यावेळी सारस्वताने एकमताने निवडून दिलेल्या साहित्यिक अरूणा ढेरे अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेणार आहेत. मावळते अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी गेल्याच वर्षी खडे बोल सुनावले होते. आता प्रश्‍न आहे तो यावर्षीचा. अभिव्यक्‍ती स्वातंत्र्याच्या रक्षणाची, प्रत्येक साहित्यिकाच्या अभिव्यक्‍तीला पोषक वातावरण निर्माण करून देण्याची जबाबदारी साहित्य संमेलनाची. या संमेलनाचे प्रमुख असलेल्या अध्यक्षाची. अरूणा ढेरे या वाचकप्रिय लेखिका. चालू काळात मराठी भाषेला कौतुक वाटावे असे त्यांचे कर्तृत्व. भूमिका न घेण्याचा बोटचेपेपणा त्यांच्या वृत्तीत नाही. तरूणपणी त्या आणिबाणिला विरोध करण्यासाठी आंदोलनात उतरल्या होत्या, एकाअर्थाने त्या नयनताराबाईंच्या सहप्रवासी. संमेलनाशी संबंधित साहित्यव्यवहाराला मान देत त्या यवतमाळात जातील अन तेथे मंचावरून या प्रकाराला उत्तर देतील तर ते अत्यंत योग्य ठरेल. ज्या गावात संमेलन होते तेथे सारस्वताबददल आदर असलेल्या सामान्यंजनांची गर्दी होते. साहित्यिकांबददल मनात आदरभावना असलेली जी मंडळी असतात, ती तेथे डोकावतात. प्रदर्शनातून आवडती पुस्तके विकत घेतली जातात. त्यामुळे साहित्यव्यवहाराला चालना मिळते. संमेलने ज्या गावात होणार असतात त्या गावात त्यांची चर्चा होते. त्यामुळेच त्यांच्या उत्साहावर पाणी पडू न देता झाल्या प्रकाराचा लक्ष्मीकांत देशमुख आणि अरूणा ढेरे निषेध करतील तर ते निंदय प्रकाराला दिलेले खरे उत्तर ठरेल.ते योग्य ठरेल आणि आवश्‍यकही असेल. अरूणा ढेरे सरस्वती चे मूर्त रूप भासतात अशी सुंदर प्रतिक्रिया एका साहित्यप्रेमी भगिनीने त्यांच्या निवडीनंतर दिली होती. अरूणाताई आता दुर्गाही होतील. 

पुढचा मुददा सध्याच्या वादात काहीसा गौण असला तरी त्यावर चिंतन होणे आवश्‍यके. साहित्य व्यवहाराशी नाते सांगणारी शंभर दिडशे मंडळी संमेलनाच्या संकल्पनेभोवती फिरत असतात, त्यातील काहीजण खरोखर साहित्यव्यवहारावरील निखळ प्रेमाने तेथे असतात तर काहींना मात्र या मंचाचा उपयोग करून घ्यायचा असतो. दुसरा वर्ग हाच साहित्यसंमेलनाभोवती तयार होणाऱ्या वादाचे मूळ कारण.यवतमाळमध्ये सध्या सुरू असलेला निंदय प्रकारही याच पार्श्‍वभूमीवर तपासायला हवा.मुळात शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हयात साहित्य संमेलनाचे आयोजन का व्हावे हा प्रश्‍न. संवेदनशील लेखकांनी या आत्महत्यांचे गांभीर्य ओळखून तेथे वागणे ही झाली अपेक्षा, ती पूर्ण होत नसते. यवतमाळच्या संस्थेने हे संमेलन आयोजित करायचे ठरवले, महामंडळाने त्यास मान्यता दिली, संमेलन ठरले. आता ते किमान साधे तरी व्हावे. आयोजकांना प्रायोजित करणारी साहित्यबाह्य धनाढय मंडळी वेगवेगळे आग्रह धरतात, त्यामुळे संमेलन झाकोळते अशीतक्रार दरवेळी केली जाते.ती दूर करण्यासाठी साहित्यिकांनी वाचकांना समवेत घेत संमेलनांच्या संचालनासाठी निधी उभारावा. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी साहित्यिकांना बैल संबोधले होते तेंव्हा साहित्यसंमेलनांसाठी उभारलेल्या कोषात योगदान दया, पायावर उभे राहू अशी चळवळ सुरू झाली. कालनिर्णयकार साळगावकर यांनी त्यात भरघोस निधी टाकला असे आठवते.त्यानंतर डॉ.श्रीपाद भालचंद्र जोशी यांनीच जनतेने निधी दयावा असे आवाहन केले. त्याला फारसा प्रतिसाद नाही. साहित्यसंमेलन हे जनतेच्या प्राधान्यक्रमात नाही हे त्यातून स्पष्ट होते हे संबंधितांच्या लक्षात आले असेलच, आजचा प्रश्‍न अर्थातच वेगळा आहे. भाषणस्वातंत्र्याला विरोध करण्याच्या वृत्तीला विरोध करणे आज आवश्‍यक ठरते आहे. आयोजकांनी पुरेशी शोभा करून घेतली आहे, त्यावर मात करण्याची जबाबदारी अध्यक्षांची आहे.भाषणातून ती पूर्ण झाली तर नयनताराजींनाही न्याय मिळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com