
MVA Vajramuth Rally : टिल्ली टिल्ली लोकं पण…; अजित पवारांचा नाव न घेता नितेश राणेंना टोला
Ajit Pawar In MVA Vajramuth Rally : महाविकास आघाडीची तिसरी वज्रमूठ सभा आज (१ मे) मुंबईत झाली. या सभेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाच्या नेत्यांची उपस्थितीमध्ये झालेल्या या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी चौफेर फटकेबाजी केल्याचं दिसून आलं. या सभेला संबोधित करताना अजित पवारांनी सत्ताधारी नेत्यांवर जोरदार प्रहार केले.
महाविकास आघाडीची वज्रमूठ सैल पडल्याच्या राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांवर देखील अजित पवार यांनी वक्तव्य केलं. यासोबतच पवारांनी नाव न घेता भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यावर देखील टीका केली आहे.
अजित पवार म्हणाले की, महाविकास आघाडीमधील ऐकी टिकवून ठेवण्यासाठी थोडसं दोन तीन पावलं पुढं मागे व्हावं लागलं तरी कार्यकर्त्यांनी त्याबद्दलची मानसिकता ठेवली पाहिजे . त्यासंदर्भत वरिष्ठांनी देखील मनाचा मोठेपणा दाखवला पाहिजे. निवडून येण्याची क्षमता असेल तो महाविकास आघाडीचा उमेदवार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
आपल्यामध्ये देखील बातम्या पसरवल्या जातात आलिकडच्या काळात वाचाळविरांची संख्या देखील वाढली आहे असे अजित पवार म्हणाले. टिल्ली टिल्ली लोकं पण काहीपण बोलायला लागली आहेत. काय बोलतोय काही नाही... यांचे काही शब्द मीडियाला काही शब्द दाखवता पण येत नाहीत. असा सत्ताधारी पक्षाचा कारभार चालला आहे, असे अजित पवार म्हणाले.
उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपकडून आमदार नितेश राणे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. संजय राऊत यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर रोज नितेश राणे हे प्रत्युत्तर पत्रकार परिषद घेतात. नितेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.