Vidhan Sabha 2019 : डाव्या पक्षांचा आघाडीत खोडा; घोषणा लांबणीवर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

काँग्रेस-राष्ट्रवादी काॅग्रेस व समाजवादी पक्षात सामंजस्य झाल्यानंतरही शेतकरी कामगार पक्ष व इतर डाव्या पक्षामुळे आघाडीची घोषणा पुन्हा लांबणीवर पडली आहे. आज आघाडीच्या अधिकृत घोषणेसाठी बोलावण्यात आलेली पत्रकार परिषद आघाडीची घोषणा न करताच गुंडाळण्याची नामुष्की काॅग्रेस राष्ट्रवादीच्या  नेत्यांवर ओढावली.

मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादी काॅग्रेस व समाजवादी पक्षात सामंजस्य झाल्यानंतरही शेतकरी कामगार पक्ष व इतर डाव्या पक्षामुळे आघाडीची घोषणा पुन्हा लांबणीवर पडली आहे. आज आघाडीच्या अधिकृत घोषणेसाठी बोलावण्यात आलेली पत्रकार परिषद आघाडीची घोषणा न करताच गुंडाळण्याची नामुष्की काॅग्रेस राष्ट्रवादीच्या  नेत्यांवर ओढावली.

काॅंग्रेस राष्ट्रवादी सह शेकापच्या अनेक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात केली आहे. मात्र आघाडीतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. आज शेकापच्या कार्यालयात सर्व घटक पक्षाची बैठक सकाळपासूनच सुरू होती. आघाडी अंतिम झाल्याचे संकेत असल्याने दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद बोलावली. त्यामधे दोन वेळा या पत्रकार परिषदेच्या वेळा बदलल्या. अखेर पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त करत आघाडीची चर्चा अद्यापही सुरू असल्याचे सांगत घोषणा लांबणीवर पडल्याचे जाहिर केले. 

दरम्यान, काॅग्रेस व राष्ट्रवादी आघाडीत शेकापने 40 जागांचा आग्रह कायम ठेवला आहे. तर डाव्या पक्षांनी देखील सोलापूर, नाशिक व पालघर मधील जागा हव्यात अशी ताठर भूमिका घेतली आहे. ऐनवेळी या डाव्या पक्षांनी तडजोड करण्यास नकार दिल्याने काॅग्रेस राष्ट्रवादीचे नेते हतबल झाले आहेत. 

समाजवादी पक्षाने सात जागांची मागणी केली होती. मात्र तीन जागांवर सहमती दर्शवत आघाडीत सामिल होण्याचा निर्णय अबु आजमी यांनी या पत्रकार परिषदेत जाहिर केला. समाजवादी पक्षाला भिवंडी, शिवाजीनगर-मानखुर्द व औरंगाबाद पुर्व या जागा देण्यात आलेल्या आहेत. तथापी, आघाडीतल्या डाव्या पक्षांच्या भूमिकेमुळे आघाडीतील जागावाटपाचे सुत्र अजूनही अनिश्चितचं असल्याचे स्पष्ट झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ncp and Congress alliance announcement delay Due to Left Parties