राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षपदावरून तटकरे पायउतार..!

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची चार वर्षे धुरा सांभळल्यानंतर आज सुनील तटकरे यांनी स्वत:हून या पदासाठी आपल्या नावाचा विचार करू नये, अशी भूमिका स्पष्ट करत प्रदेशाध्यक्षपदावरून पायउतार होण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर लगेचच दोन तासांत त्यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी निवड झाल्याचे केंद्रीय नेते डी. पी. त्रिपाठी यांनी जाहीर केले. यामुळे रविवार (ता. 29) पुणे येथील पक्षाच्या बैठकीत प्रदेशाध्यक्षपदी नवीन चेहरा येणार हे स्पष्ट झाले.

नवीन प्रदेशाध्यक्षपदासाठी पक्षाचे विधिमंडळ गटनेते जयंत पाटील यांच्या नावाची चर्चा असली, तरी प्रादेशिक व सामाजिक समीकरण जुळविण्यासाठी युवा व आक्रमक चेहऱ्यालाही संधी मिळू शकते, अशी अटकळ बांधली जात आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार राजकीय धक्‍कातंत्र देण्यात माहीर असल्याने नव्या प्रदेशाध्यक्षपदी नेमकी कोणत्या नेत्याला संधी मिळते याची उत्सुकता शिगेला पोचली आहे.

आज पत्रकार परिषदेत तटकरे यांनी त्यांच्या चार वर्षांच्या कारकिर्दीचा आढावा घेत, पक्षाने आतापर्यंत खूप संधी दिली. सलग चार वर्षे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपविली. आता या पदासाठी आपला विचार होऊ नये असे स्पष्ट केले. "राष्ट्रवादी'ला मराठा मतदारांसोबतच ओबीसी, दलित मतदारांना आकर्षित करणाऱ्या आक्रमक प्रदेशाध्यक्षपदाची गरज आहे. राज्यभरात हल्लाबोल आंदोलनाच्या माध्यमातून अजित पवार, सुनील तटकरे, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील यांच्यासह पक्षाच्या दुसऱ्या फळीतले आक्रमक नेते धनंजय मुंडे यांनी छाप पाडली आहे. त्यातच पश्‍चिम महाराष्ट्रासह इतर प्रादेशिक विभागांना प्रतिनिधित्व देताना पक्षाला संतुलन सांभाळावे लागेल.

सध्या जयंत पाटील यांचे नाव प्रदेशाध्यक्षपदासाठी अग्रेसर असले, तरी ऐनवेळी शरद पवार धक्‍कातंत्र वापरत नवा चेहरादेखील देतील, अशी चर्चा पक्षाच्या नेत्यामध्ये सुरू आहे.

Web Title: NCP chairman sunil tatkare jayant patil politics