शरद पवार म्हणाले, 'माझ्याकडे येऊ नका'

शरद पवार म्हणाले, 'माझ्याकडे येऊ नका'

मुंबई : सत्ता स्थापनेच्या चर्चांमध्ये मीडियाने केलेल्या चुकीच्या वार्तांकनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारा यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काल (बुधवार 13 नोव्हेंबर) रात्री मुंबईतील पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानाबाहेर उभ्या असलेल्या पत्रकारांना त्यांनी त्यांच्याच भाषेत खडसावले. याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. 'विधानाचा विपर्यास करणार असाल तर, माझ्याकडे येऊ नका,' असे पवार यांनी म्हटले आहे. 

थोडी तरी पथ्यं पाळा : शरद पवार

काल रात्री काही वृत्तवाहिन्यांनी केलेल्या वर्तांकनावर नाराज होऊन, शरद पवार यांनी सिल्व्हर ओक निवासस्थानाबाहेर येत पत्रकारांना खडसावले. ते म्हणाले, 'व्यक्तिगत जीवनात आम्ही सभ्यतेने वागत असलो आणि याचा अर्थ तुम्ही मर्यादा सोडत असाल तर, उद्यापासून मी तुम्हाला भेटणार देखील नाही. तुम्हाला हे हवं असेल तर, सांगा. किती वेळा सांगितलं तुम्हाला. तुम्ही कशासाठी पुन्हा पुन्हा तसे प्रश्न विचारता.

अजित पवार मुंबईत आहेत. या पक्षांच्या बैठकीसाठी ते मुंबईतच आहेत. उद्या सकाळी ते तुम्हाला इथेच भेटतील. त्यांनी एखादी गोष्ट सांगितली की त्यांच्या गाड्या लगेच मागं लागतात. प्रायव्हसी जाते. त्यामुळं त्यांनी ते ठरवून सांगितलं. कुठंही गेलं की तुमच्या गाड्या पाठीमागून धावत सुटतात. थोडी तरी काही पथ्यं पाळली पाहिजेत. मी मुद्दा बघतोय तुम्ही ही बातमी कशी देता. आताच पाहिलं मी. तुम्ही जर, अशा सगळ्यांच विधानांचा विपर्यास करणार असाल तर, उद्यापासून इथं येऊ नका.' मीडियातून येणाऱ्या बातम्यांवर पवार यांनी नाराजी व्यक्त केली.

राष्ट्रवादी म्हणते, मुख्यमंत्री शिवसेनेचाच

दरम्यान, शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या महाशिवआघाडीची चर्चा पुढे सरकत आहे. राज्यात पर्यायी सरकार स्थापन करण्यासाठी तिन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू असून, मुख्यमंत्रिपद शिवसेनेला देण्याबाबत राष्ट्रवादीने अनुकूलता दाखवली आहे. तिन्ही पक्षांचे मिळून सरकार स्थापन झाले तरच ते टिकेल आणि सर्वाधिक जागा असलेल्या पक्षाचा मुख्यमंत्री असेल, असे राष्ट्रवादीने स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियाला दिलेल्या मुलाखतीत ही भूमिका स्पष्ट केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com