
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या बंडानंतर पक्षात पडलेले दोन गट एकमेकांविरोधात उभे ठाकल्याचे पाहायला मिळत आहे. यादरम्यान राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून शरद पवार गटाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. अजित पवार गटाने पक्षविरोधी कृत्य केल्याचा ठपका ठेवत शरद पवार गटातील आमदारांना तात्काळ आपात्र करा अशी मागणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे करण्यात आली आहे.
अजित पवार यांनी काही समर्थक आमदांसह बंड केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. अजित पवार यांचा गट सत्तेत सामील झाला. यानंतर सत्तेत सहभागी झालेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांना निलंबित करावे अशी मागणी शरद पवार गटाकडून करण्यात आली होती. अजित पवार गटाने मात्र भूमिका घेतली नव्हती. आता अजित पवार गटाने देखील शरद पवार गटातील आमदारांवर कारवाईची मागणी केली असून पक्षविरोधी कारवाई केल्याने त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी केली आहे.
तसेच राष्ट्रवादी पक्ष कोणाचा? यावरून काही दिवसांपासून चर्चा सुरू आहेत. त्यातच आता मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपलाच आहे, असा दावा देखील अजित पवार गटाने केला आहे. यासंबंधीचे वृत्त साम टीव्हीने दिले आहे.
अजित पवार गटाकडून करण्यात आलेल्या या मागणीनंतर आता राष्ट्रवादीतील दोन्ही गटात राजकारण तापण्याची शक्यता असून यावर शरद पवार गट काय प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
६ ऑक्टोबरला सुनावणी
अजित पवारगटाकडून दाखल करण्यात आलेल्या या याचिकेनंतर आता विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेणार याकडेच सर्वांचं लक्ष लागून आहे. तसेच राष्ट्रवादी पक्ष कोणाचा आणि निवडणूक चिन्ह कोणाला मिळणार याबाबत ६ ऑक्टोबरला सुनावणी निवडणूक आयोगासमोर होणार आहे. या दिवशी अजित पवार आणि शरद पवार गट हे दोन्ही गट आपली भूमिका आयोगासमोर मांडणार आहेत. त्यामुळे या सुनावणीकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे.