
Eknath Khadse : गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाचा सरकारला विसर; एकनाथ खडसे
मुंबई : ‘‘मारवाडी-बामणाचा असताना मुंडे यांनी भारतीय जनता पक्ष बहुजन समाजाचा करण्यासाठी योगदान दिले. महाराष्ट्रात भाजपला बळ देणाऱ्या गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासाठी संभाजीनगरमध्ये एका डेअरीमधील जागा निश्चित केली होती.
मात्र, मुंडे यांच्या स्मारकाचा सरकारला विसर पडला आहे,’’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते एकनाथ खडसे यांनी अर्थसंकल्पाच्या चर्चेत सरकारवर केली. छत्रपती शिवाजी महाराज, वीरमाता जिजामाता यांच्या स्मारकाचे काय झाले, जिजाऊसृष्टीचा एक उल्लेखही अर्थसंकल्पात नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
अर्थसंकल्पावर बुधवारी आयोजित केलेल्या चर्चेत सकाळच्या विशेष सत्रात खडसे यांनी अर्थसंकल्पामधील त्रुटींवरुन सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ‘‘देशात विकासात प्रथम क्रमांकावर राहणारे राज्य आता पाचवर आले आहे.
भांडवली गुंतवणूक यायला तयार नाही. आकड्यांचा खेळ सुरू आहे. हे सगळे आकडे बनावट आणि फसवे आहेत. या आकडेवारीत हेराफेरी करण्यात आलेली आहे. कृषी आणि सेवा क्षेत्रातील घट चिंताजनक आहे.
तर दुसरीकडे राज्यातील विविध विकास मंडळांना पैसा देणे गरजेचे आहे, कारण प्रत्येक क्षेत्रामध्ये अनुशेष आहे. हा अनुशेष कसा भरणार याबाबत एक शब्दही अर्थसंकल्पात नाही. मग हा कसला अर्थसंकल्प आहे?’’
‘‘आपले जे ४० आमदार आहेत. ते येथे आले आहेत. सत्तांतर झाल्यानंतर या राज्यात सर्वांत जास्त लाड या ४० आमदारांचे सुरू आहेत. या आमदारांची हजार हजार कोटींची कामे तातडीने करावीत, अशी मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी केलेली शिफारस पत्रे मी पाहिली आहेत,’’ अशी माहिती खडसे यांनी सभागृहाला दिली.
त्यावर पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आक्षेप घेत ‘कोणीही मंत्री मुख्यमंत्र्यांकडे मागणी घेऊन आले तर त्यांना पत्रे देण्याचा, कामे तातडीने करण्यासाठी स्वाक्षरी करण्याचा प्रघात आह,’’ असे स्पष्ट केले.
‘भूषण देसाई पावन झाले’
शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी चार लाख १४०० चौरस मीटर औद्योगिक जमिनीचे रहिवासी जमिनीत रूपांतर केले. यात तीन हजार कोटींचा गैरकारभार झाला आहे. याची उच्चस्तरीय समिती स्थापन करून चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे अतुल भातखळकर आणि ‘एमआयएम’चे इम्तियाज जलील यांनी केला होता.
या प्रकरणी उच्चस्तरीय समितीची स्थापन केली. त्यानंतर आता ‘ईडी’कडून चौकशी केली जाईल, अशी भीती भूषण देसाई यांना घातली. त्यामुळेच त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे,’’ असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला. शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर भूषण देसाई यांची उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करणार का?, की, शिंदे गटात सामील झाल्यावर भूषण देसाई पावन झाले, असा सवाल खडसे यांनी केला.