
Sharad Pawar: सोलापूर लोकसभेच्या जागेची राष्ट्रवादी फिरविणार भाकरी; संघर्ष टाळण्यासाठी पवारांची सावध भूमिका
टप्यात आलं की त्याचा करेक्ट कार्यक्रम करायचा. ह्या हाताचं त्या हाताला काही कळू द्यायचं नाही. योग्य वेळी योग्य निर्णय घ्यायचा. संघर्ष टाळण्यासाठी नेहमी सावध भूमिका ठेवायची अन् आपलं ईप्सित साध्य करायचं. ही शरद पवारांची राजकारणातील चतुर नीती. याच चतुर नीतीचा प्रत्यय त्यांच्याकडून भविष्यात सोलापूरकरांना आला तर त्याचे नवल वाटायला नको. रविवार (ता.७ ) च्या सोलापूर दौऱ्यात शरद पवारांनी असचं काहीसं ठरविलं. जे पेराचं मनात ठरविलं ते भविष्यात निश्चितपणानं उगवणार.
शरद पवार यांनी जे काही ठरविलं ते सोलापुरच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये. इथल्या तिघा ज्येष्ठ नेतेमंडळींकडून भूतकाळ, वर्तमानकाळ अन् भविष्यकाळ यामधली खडान्खडा माहिती घेतली. सगळं काही नीटपणे ऐकून घेतलं. मनात जे काही आडाखे बांधायचे ते बांधले...अन् शरद पवार यांनी चला ओके ! असं म्हणते त्या तिघा नेतेमंडळींचा निरोप घेतला. दरम्यान, यावेळी त्यांची जी देहबोली होती, ती खूप काही सांगून गेली. सोलापूर लोकसभेच्या जागेची भाकरी फिरवायची, या जागेचा करेक्ट कार्यक्रम करायचा हा त्यांचा मनसुबा असावा हेच खरं.
रविवारी रात्री शरद पवारांनी माजी महापौर ॲड.यु.एन.बेरिया, महेश कोठे आणि ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांच्याकडून सोलापूर लोकसभेबद्दल अत्यंत सुक्ष्म माहिती घेतली. या मतदार संघात चार वेळा काँग्रेसचा पराभव झालेला आहे. माजीमंत्री स्वर्गीय आनंदराव देवकते, ज्येष्ठ नेत्या उज्वला शिंदे तसेच ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना येथे पराभूत व्हावं लागलं. सुशीलकुमार शिंदे यांनी लोकसभा लढणार नसल्याची जाहीर केलं आहे. आमदार प्रणिती शिंदे या लोकसभा लढण्याला राजी नाहीत. या मतदारसंघासाठी राखीवमधून सक्षम चेहरा नाही. तेव्हा ही जागा राष्ट्रवादीकडे घ्यायला हरकत नाही
तसेच सध्याच्या विद्यमान खासदारांबद्दल संपूर्ण मतदारसंघात नाराजी आहे. सोलापूर लोकसभेमधील सहा विधानसभा मतदार संघात काय स्थिती आहे, या मतदार संघामधून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला कसं मतदान मिळू शकतं यासह अनेक मुद्यांवर श्री पवार यांना माहिती देण्यात आली.
चेतन नरोटे म्हणाले…‘त्या’मध्ये तथ्य नाही
सोलापूर लोकसभेच्या जागा अदलाबदलाबाबतचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आल्यानंतर काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी आज सोमवारी विचारले असता ते म्हणाले. सोलापूरची जागा राष्ट्रवादी घेणार यात अजिबात तथ्य नाही. खुद्द शरद पवार यांनीच प्रसारमाध्यमांसमोर स्पष्टीकरण दिले आहे. काँग्रेसची जागा राष्ट्रवादी घेणार हे कदापि शक्य नाही.
शरद पवारांचं अंदर-बाहर
सोलापूर लोकसभेची जागा राष्ट्रवादीकडे घेण्याबद्दल ज्येष्ठ नेतेमंडळीसोबत चर्चा करत असताना शरद पवारांनी वेगळी भूमिका घेतली आणि बाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना वेगळी भूमिका मांडली. सोलापूरच्या जागेबद्दल महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा होईल, त्यावर आता बोलणं सुखद होणार नाही, असे सांगत पवारांनी जागा अलदाबदलीवरुन होणारा संघर्ष टाळण्याचा व्होरा दिसतो.
राष्ट्रवादीवाल्यांमध्ये मात्र उत्साह
लोकसभेची जागा राष्ट्रवादी घेण्याबद्दल जी चाचपणी केली, त्यावर काँग्रेसच्या गोटात अस्वस्थ अन् सन्नाटा पसरल्याचे वातावरण होते. त्या तुलनेत राष्ट्रवादीवाल्यांमध्ये मात्र वेगळा उत्साह संचारल्याचे दिसले. त्या तीन ज्येष्ठ नेत्यांना चर्चेसाठी मुंबईला बोलावले आहे.