Jitendra Awhad : "अन् कुरूलकरने एका बाईसाठी देश विकायला…"; आव्हाडांनी केरळ स्टोरीवरुन साधला निशाणा | The Kerala Story Movie Controversy | DRDO Scientist Pradeep Kurulkar news | NCP News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ncp jitendra awhad on FIR agains him over the kerala story slam drdo scientist pradeep kurulkar

Jitendra Awhad : "अन् कुरूलकरने एका बाईसाठी देश विकायला…"; आव्हाडांनी केरळ स्टोरीवरुन साधला निशाणा

Jitendra Awhad on The Kerala Story: देशात सध्या द केरळ स्टोरी आणि डीआरडीओचे संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर या दोन मुद्द्यांवर वातावरण चांगलंच तापलं आहे.

या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध 'द केरळ स्टोरी'(The Kerala Story) च्या निर्मात्यासाठी 'सार्वजनिकरित्या फाशी देण्यात यावी' असे विधान केल्याबद्दल ठाण्यातील वर्तक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्यावर आयपीसी कलम ५०० अंतर्गत नॉन-कॉग्निझेबल (NC) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर जिंतेंद्र आव्हाडांनी प्रतिक्रिया दिली आहे. आव्हाडांनी ट्वीट करत या प्रकरणावर भाष्य केलं आहे.

आव्हाडांनी हनीट्रॅपमध्ये अडकून संरक्षण क्षेत्रातील गोपनिय माहिती पाकिस्तानला दिल्याच्या आरोपता अटकेत असलेले डीआरडीओचे संचालक आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.

आव्हाड नेमकं काय म्हणालेत?

गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आव्हाडांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, "चित्रपटाची बदनामी केली म्हणून काही भक्तांनी वर्तकनगर पोलीस स्टेशन येथे माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे आणि गुन्ह्यामध्ये म्हटलं आहे की द केरला स्टोरी या चित्रपटाची जितेंद्र आव्हाड यांनी बदनामी केली."

"माझा प्रश्न असा आहे की, कुरुलकर या अतिशय महत्वाच्या जागी असलेल्या संशोधकाने या देशाची अत्यंत गुप्त माहिती पाकिस्तानला दिली. तो कोणत्या जातीचा, कोणत्या धर्माचा, कोणत्या राज्याचा प्रतिनिधी नाही तर तो गद्दार आहे." असेही आव्हाड म्हणालेत.

तसेच "आता कुरुलकरवर बोललो म्हणजे मी कुठल्या जातीबद्दल बोललो असे होत नाही. किंवा कुठल्या धर्माबद्दल बोललो असे होत नाही. विकृतीला गद्दारीला आणि आतंकवादाला धर्म, जात, पंथ. राज्य. राष्ट्र नसते. हे यावरुन तरी आपल्या लक्षात येईल. कुरुलकरचे मूळ आणि कुळ शोधा मग कळेल आपल्याला." असंही आव्हाडांनी म्हटलं आहे.

हेही वाचा - Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

याच्या नावाने कोणती स्टोरी येणार?

पुढे जितेंद्र आव्हाड लिहीतात की, "नशीबाने द केरला स्टोरी हा चित्रपट प्रदर्शित व्हायला आणि कुरुलकरने एका बाईसाठी देश विकायला एकच वेळ आली. यालाच योगायोग म्हणतात. हाच कुरुलकर पुण्यामध्ये सावरकर व्याख्यानमालेत देशभक्तीचे व्याख्यान देत होता. आता याला आपण काय म्हणाल? "

"याच्या नावाने कोणती फाईल्स किंवा कोणत्या स्टोरीचा चित्रपट बनवायचा. आता मात्र ट्रोलर्स आणि माझ्यावर आग ओकणारे तोंडावर बोट ठेवून आज दिवसभर शांत राहतील. ज्यांच्या डीएनएमध्येच गद्दारी आहे, फितुरी आहे ते आम्हांला काय अक्कल शिकवणार. ह्याला इतिहासच साक्ष आहे." असेही आव्हाड म्हणाले आहेत.