'मला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आलं, माझा छळ करण्यात आला, माझ्यावर..'; देशमुखांचा गंभीर आरोप I Anil Deshmukh | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

anil deshmukh

विधानसभा, लोकसभा निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊनच लढवणार आहोत. निवडणुकीत तिन्ही पक्ष एकत्र बसून जागा वाटपाचा निर्णय घेतील, असेही देशमुख यांनी सांगितले.

Anil Deshmukh : 'मला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आलं, माझा छळ करण्यात आला, माझ्यावर..'; देशमुखांचा गंभीर आरोप

कऱ्हाड : ‘केंद्रीय एजन्सीचा गैरवापर करून राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) टार्गेट केले जात आहे, हे दुर्दैवी आहे. महाराष्ट्रात असले कधीही गलिच्छ राजकारण नव्हते. ज्या राज्यात भाजपची (BJP) सत्ता नाही तेथे खोटे आरोप करायला लावून चौकशी सुरू करायची, हा उद्योग देशात सुरू आहे.

हा केवळ राजकीय विरोधकांना त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे. ईडीच्या (ED) गैरवापराबाबत देशातील सर्व विरोधी पक्षांनी राष्ट्रपतींना निवेदन दिले आहे. त्यावर काय प्रतिसाद मिळतोय, त्याची वाट आम्ही पाहतोय,’ असे मत माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी व्यक्त केले.

माजी गृहमंत्री देशमुख खासगी दौऱ्यानिमित्त येथे आले होते. त्यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘राजकारणात विरोध राहतो. मात्र, एजन्सीचा गैरवापर करून काही लोकांना चौकशीसाठी बोलवायचे, तुरुंगात टाकायचे, असे प्रकार सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला टार्गेट करण्यात येत आहे, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. माझ्यावर तर शंभर कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आला. मात्र, प्रत्यक्ष आरोपपत्र दाखल केले तेव्हा त्यात एक कोटी ७२ लाखच नमूद करण्यात आले.

मला खोट्या आरोपात अडकविण्यात आले. माझा छळ करण्यात आला. न्यायालयाने माझ्यावर आरोप करण्यात आले ते ऐकीव माहितीच्या आधारे करण्यात आल्याचे निरीक्षण नोंदवले. खोटे आरोप करायला लावून चौकशी सुरू करायला लावायचा उद्योग राज्यात सुरू आहे. संजय राऊत यांनाही तुरुंगात टाकण्यात आले. मध्यंतरी हसन मुश्रीफ यांच्या मागे लागले. आता जयंत पाटील यांना त्रास सुरू केला आहे.

हा केवळ राजकीय विरोधकांना त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे. ईडीच्या गैरवापराबाबत देशातील सर्व विरोधी पक्षांनी राष्ट्रपतींना निवेदन दिले आहे. त्यावर काय प्रतिसाद मिळतोय, त्याची वाट आम्ही पाहतोय.’ नोटाबंदीबाबत ते म्हणाले, ‘नोटाबंदीने सर्व समाजाला त्रास झाला. दोन हजाराची नोटबंदी का झाली? याला थातूरमातूर उत्तर दिले जात आहे. कोणत्या अर्थतज्ज्ञाला विचारून नोटबंदी केली, ही माहिती आता पुढे येईल.’

राष्ट्रवादी काँग्रेसच मोठा पक्ष आहे, या विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या दाव्यावर ते म्हणाले, काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे आमदार जास्त होते. त्यावेळेला ते आमचे मोठे भाऊ होते. आता राष्ट्रवादीचे आमदार, खासदार मोठ्या संख्येने आहेत, त्यामुळे आता आम्ही मोठे भाऊ आहोत. मात्र, विधानसभा, लोकसभा निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊनच लढवणार आहोत. निवडणुकीत तिन्ही पक्ष एकत्र बसून जागा वाटपाचा निर्णय घेतील, असेही देशमुख यांनी सांगितले.

सदाभाऊंचे राजकीय ज्ञान फार कमी

यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच दूरदृष्टीचे नेते आहेत, या रयत क्रांती शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्यावर श्री. देशमुख यांना छेडले असता ते म्हणाले, सदाभाऊ खोत यांचं राजकीय ज्ञान फार कमी दिसते. ज्येष्ठ नेते शरद पवारांसारखे ज्ञान देशात कोणाचे नाही. सर्वात ज्येष्ठ राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे सदाभाऊंनी गेल्या ५० वर्षांतील राजकारणाचा अभ्यास करून त्यांनी पवारांशी कोणाची तुलना करायची ते ठरवावे, अशीही टिप्पणी केली.