...आणि भुजबळांची 'लिलावती' वारी टळली

विजय गायकवाड
सोमवार, 7 मे 2018

मार्च महिन्यात पुन्हा एकदा भुजबळांनी रुग्णालयात भरती होण्यासाठी प्रयत्न केला होता. सुत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार भुजबळांसाठी वांद्रे येथील रुग्णालयात भरती 
करण्याची सुंपुर्ण तयारी करण्यात आली होती. जे.जे. रुग्णालयात गॅस्ट्रोएन्टरोलॉजिस्ट उपलब्ध नसल्याने न्यायालयाने पर्यायी रुग्णालयांची माहीती मागवली होती.

मुंबई : आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी जामीनावर सुटका झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांना लिलावती रुग्णालयात उपचार घेण्याची इच्छा होती. परंतू जेजे रुग्णालयांतील डॉक्टरांच्या अहवालामुळे छगन भुजबळांना लिलावती ऐवजी केईएमचा मुक्काम घडल्याचे स्पष्ट  झाले आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भुजबळ कोठडीऐवजी रुग्णालयात भर्ती होण्यासाठी आटापीटा करत असल्याचा आरोप केला होता. यापुर्वी छगन भुजबळ यांनी तब्बल 35 पेक्षा जास्त दिवस यांनी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये मुक्काम केला होता. जे.जे. रुग्णालयाचे तत्कालिन अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांच्या मदतीनेच भुजबळ यांनी हा मुक्काम केल्याचा ठपका मुंबई सत्र न्यायालयाने ठेवला होता. विशेष म्हणजे या प्रकरणात आर्थर रोड प्रशासनाच्या एका वैद्यकीय अधिकाऱ्यांचे निलंबनही झाले होते.

मार्च महिन्यात पुन्हा एकदा भुजबळांनी रुग्णालयात भरती होण्यासाठी प्रयत्न केला होता. सुत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार भुजबळांसाठी वांद्रे येथील रुग्णालयात भरती 
करण्याची सुंपुर्ण तयारी करण्यात आली होती. जे.जे. रुग्णालयात गॅस्ट्रोएन्टरोलॉजिस्ट उपलब्ध नसल्याने न्यायालयाने पर्यायी रुग्णालयांची माहीती मागवली होती.

जे.जे. प्रशासनाने यापुर्वीचे अनुभव लक्षात घेऊन सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालयात उपलब्ध असलेल्या गॅस्ट्रोएन्टरोलॉजिस्ट विभागांची यादी न्यायालयात सादर केली होती. यादीतील एक़मेव पलिकेचे रुग्णालय असल्याने भुजबळांना केईएममध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. छगन भुजबळ यांचा जामीन मंजूर झाला असला तरी ते सध्या केईएममध्ये हिपॅटोपॅनक्रिअ‍ॅटोबिलिअरी विभागात दाखल 
आहेत. आर्थर रोड जेल प्रशासन आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या परवानगी दिल्यानंतर छगन भुजबळ यांना पोटावरील उपचारांसाठी केईएम रुग्णालयात असून वार्ड क्रमांक 43 मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

भुजबळ यांच्या स्वादुपिंडाला संसर्ग झाल्याने त्यांना पोटदुखीचा त्रास होत असल्याचे चाचण्यांवरून समोर आले होते. त्यामुळे भुजबळ यांना कार्डिअ‍ॅक केअर युनिटमध्ये ठेवण्यात आले होते. जेजे रुग्णालयात हिपॅटोपॅनक्रिअ‍ॅटोबिलिअरी (एसपीबी) आणि गॅस्ट्रोएन्टरोलॉजी (जीआय) सुपर स्पेशालिटी विभाग उपलब्ध नाहीत. लिलावती रुग्णालयात भरती होण्याची इच्छा असूनही केवळ जेजेच्या अहवालामुळे त्यांना केईएम द हिपॅटोपॅनक्रिअ‍ॅटोबिलिअरी विभागात दाखल करण्यात आले आहे.

Web Title: NCP leader Chagan Bhujbal in KEM hospital