'अब की बार, मोदी की हार' 

नीलेश दिवटे
गुरुवार, 31 जानेवारी 2019

कर्जत : "साडेचार वर्षांपूर्वी महागाईचा बाऊ करीत जनतेच्या भावनांशी खेळून भाजप सत्तेवर आले. मोदी सरकारच्या काळात डाळ, पेट्रोल, गॅस आदी जीवनावश्‍यक वस्तूंची दीडपट भाववाढ झाली. त्यामुळे महागाईला वैतागलेल्या जनतेने आता "अब की बार, मोदी की हार' असे म्हणत सत्ता परिवर्तन केले पाहिजे,'' असे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज (गुरुवार) सांगितले. तसेच नगर लोकसभा मतदारसंघाबरोबरच कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातही परिवर्तनाचा निर्धार करू, असेही ते म्हणाले. 

कर्जत : "साडेचार वर्षांपूर्वी महागाईचा बाऊ करीत जनतेच्या भावनांशी खेळून भाजप सत्तेवर आले. मोदी सरकारच्या काळात डाळ, पेट्रोल, गॅस आदी जीवनावश्‍यक वस्तूंची दीडपट भाववाढ झाली. त्यामुळे महागाईला वैतागलेल्या जनतेने आता "अब की बार, मोदी की हार' असे म्हणत सत्ता परिवर्तन केले पाहिजे,'' असे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज (गुरुवार) सांगितले. तसेच नगर लोकसभा मतदारसंघाबरोबरच कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातही परिवर्तनाचा निर्धार करू, असेही ते म्हणाले. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या निर्धार परिवर्तन यात्रेचे आज येथे आगमन झाले. यावेळी दादा पाटील महाविद्यालयासमोर झालेल्या सभेत मुंडे बोलत होते. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अध्यक्षस्थानी होते. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, युवा नेते रोहित पवार, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मंजूषा गुंड, दादाभाऊ कळमकर, डॉ. सर्जेराव निमसे, अविनाश आदिक, गुलाब तनपुरे, काका तापकीर, राजेंद्र गुंड, शहाजी राळेभात, प्रा. मधुकर राळेभात, कपिल पवार, दत्ता वारे, राजेंद्र कोठारी, श्‍याम कानगुडे, शहाजी राजेभोसले, किशोर मासाळ, ऍड. सुरेश शिंदे, नितीन धांडे, संग्राम कोते पाटील, अभिषेक कळमकर आदी उपस्थित होते. 

धनंजय मुंडे म्हणाले, "केंद्रात मोदी आणि राज्यात फडणवीस सरकारचा कारभार सारखाच आहे. दोघांनी जनतेची प्रचंड फसवणूक केली आहे. दोन कोटी युवकांना नोकऱ्या, प्रत्येकाच्या नावावर पंधरा लाख रुपये जमा करण्याचे आमिष दाखविले. मात्र, सत्तेवर आल्यानंतर चार वर्षे सात महिन्यांत या सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. त्याचा रोष व्यक्त करीत या दोन्ही सरकारला जनता घरचा रस्ता दाखवील.'' 

दरम्यान, प्रा. मधुकर राळेभात यांनी "पवार परिवारातील उमेदवार द्या. येथे बदल करू' असे सांगितले. जिल्हाध्यक्ष फाळके यांनी प्रास्ताविकात सांगितले, की लोकसभेसाठी पक्षाने दिलेला उमेदवार बहुमताने निवडून आणण्याबरोबरच विधानसभेसाठी बारापैकी आठ जागा राष्ट्रवादी जिंकेल यात शंका नाही. कर्जत-जामखेडसाठी पवार यांच्या घरातील उमेदवार द्या. निश्‍चित परिवर्तन घडेल.'

मंजूषा गुंड, डॉ. निमसे यांची भाषणे झाली. ज्ञानेश्वर जगताप यांनी सूत्रसंचालन केले. विजय मोढळे यांनी आभार मानले. 

मुंडेंच्या मृत्यूप्रकरणी भाजपवाले गप्प का? : जयंत पाटील

जयंत पाटील म्हणाले, "मतदान यंत्रातील घोटाळ्यामुळे अनेक जण जीवाला मुकले आहेत. साधा अपघात घडल्यानंतर त्याची लगेचच चौकशी होते; मात्र गोपीनाथ मुंडे यांचा घात की अपघात, याबाबत भाजपवाले गप्प का?'' पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची 2014 च्या निवडणुकीपूर्वीच्या आणि नंतरच्या भाषणांची चित्रफीत दाखवून, "आता तुम्हाला सर्व समजले आहे मी काय बोलू?' असा प्रश्न त्यांनी केला.

सरकारने माझं तोंड बंद केलं : भुजबळ

छगन भुजबळ म्हणाले, "मंत्री असताना शंभर कोटींचे महाराष्ट्र सदन बांधले. त्या एजन्सीचे पैसे अदा केले नाहीत; मात्र, साडेआठशे कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप करीत अडीच वर्षे तुरुंगात टाकून माझे सरकारने तोंड बंद केले. मात्र, राफेल गैरव्यवहाराबाबत सर्वजण मूग गिळून गप्प का? हे जातीपातीत धर्मा-धर्मात अगदी देवादिकांच्या नावावर भांडणे लावणारे सरकार आहे. आगामी काळात लोकच त्यांना त्यांची जागा दाखवतील.''

विकास झाला कुठं? : रोहित पवार

रोहित पवार म्हणाले, "जिल्ह्याचे पालकमंत्री व या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी यांचे मतदारसंघाकडे दुर्लक्ष आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी आणला असे म्हणतात मग विकास कुठे झाला व केला? खोटे बोल पण रेटून बोल, अशी सरकारची पद्धत आहे. जलयुक्त शिवार अभियानामुळे टॅंकरबाबत अडवणूक केली जात आहे. चोंडी येथे न्याय मागणाऱ्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. त्याचे उत्तर आगामी काळात आपण सर्व जण एकत्र येऊन देऊ आणि परिवर्तन करू.''

सूर्याचे पहिले किरण! 

रोहित पवार यांच्या कर्जत-जामखेड मधील संभाव्य उमेदवारीबाबत आणि रोहित भाषणाला उभे राहिल्यानंतर मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल मुंडे म्हणाले, "तुमच्या मनातील उमेदवार देण्यासाठी लोकसभेसाठी पक्षाच्या उमेदवाराला या मतदारसंघातून लीड द्या. रोहित या शब्दाचा संस्कृतमध्ये अर्थ होतो "सूर्याचे पहिले किरण.' ते कर्जत-जामखेडमध्ये यावे असे वाटत असेल, तर लोकसभेसाठी आघाडी द्या.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP Leader Dhananjay Munde Criticizes Modi Government