मुंडे साहेबांसारखा संघर्ष मला करायचाय: धनंजय मुंडे

रविवार, 10 जून 2018

माझे काका गोपीनाथ मुंडे यांनी अनेक वर्षे संघर्ष करून आपले स्थान निर्माण केले. तसेच शरद पवार यांनी माझ्यावर जबाबदारी टाकलेली आहे. त्यामुळे मलाही मुंडे साहेबांसारखा संघर्ष करायचा आहे, असे विधानपरिषदेतील नेते धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

माझे काका गोपीनाथ मुंडे यांनी अनेक वर्षे संघर्ष करून आपले स्थान निर्माण केले. तसेच शरद पवार यांनी माझ्यावर जबाबदारी टाकलेली आहे. त्यामुळे मलाही मुंडे साहेबांसारखा संघर्ष करायचा आहे, असे विधानपरिषदेतील नेते धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

धनंजय मुंडे म्हणाले, की बीड-लातूर विधानपरिषदेचा निकाल लावल्यानंतर खऱ्या अर्थाने धक्कादायक असणार आहे. आम्ही सरकारविरोधात लढत आहोत. भाजप-शिवसेनेतील नेत्यांच्या गैरव्यवहाराविरोधात मी पुरावे दिले आहेत. राष्ट्रवादीमध्ये मला खूप मोठा पाठिंबा आहे. माझे वय पाहता मला मिळालेली जबाबदारी खूप मोठी आहे. अजित पवार आणि माझ्यामध्ये केसाचेही अंतर नाही. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर जबाबदारी टाकलेली आहे. धनंजय मुंडेनी कधीच सत्तेचे स्वप्न पाहिलेले नाही. लोक आपल्या कामावर मत ठरवत असतात. महाराष्ट्रात शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार यासह अनेक प्रश्न आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत यावा हीच अपेक्षा आहे. पक्ष सत्तेत येण्यासाठी मी सर्वकाही करेल. शिवसेना-भाजप एकत्र लढली तरी राष्ट्रवादीचे आमदार सर्वाधिक निवडून येतील. राष्ट्रवादी समविचारी पक्षासोबत लढून पुन्हा सत्तेत येईल अशी मला आशा आहे. सर्वेतून उघड झाल्यामुळे अमित शहा, देवेंद्र फडणवीस संपर्क करत आहेत. वाघ म्हणणारी सेनाही झुकली आहे. महाराष्ट्रातील जनता खूप हुशार आहे.

केंद्र आणि राज्य सरकारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने काढलेल्या पश्‍चिम महाराष्ट्रातील हल्लाबोल आंदोलनाचा समारोप आज (रविवारी) पुण्यात होत आहे. त्यानिमित्ताने सहकारनगरमधील शिंदे हायस्कूलच्या मैदानावर सायंकाळी चार वाजता सभा होणार आहे. या वेळी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अन्य नेते मार्गदर्शन करणार आहेत. पक्षाचा वर्धापन दिन आणि हल्लाबोल सभेच्या निमित्ताने राष्ट्रवादी शक्तिप्रदर्शन करणार आहे. या सभेला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, सुनील तटकरे, खासदार प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ यांच्यासह सर्व नेते उपस्थित राहणार आहेत. शेतकऱ्यांसह विविध घटकांच्या मागण्यांसाठी राष्ट्रवादीने हल्लाबोल आंदोलन सुरू केले होते. याची सांगता आज पुण्यात होत असताना धनंजय मुंडे यांनी सकाळ कार्यालयाला भेट देऊन आंदोलनाविषयी माहिती दिली.

Web Title: NCP leader Dhananjay Munde in Pune