
Jitendra Awhad: '...त्यामुळे आता माझ्या जीवनाची शाश्वतीच नाही', जितेंद्र आव्हाड असं का म्हणाले?
Jitendra Awhad News: गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी काही दवे केले होते. अशातच आता जितेंद्र आव्हाड यांनी आता माझ्या जीवनाची शाश्वतीच नाही असं वक्तव्य केलं आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील गुन्हेगारीवर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरतीही सडकून टीका केली.
शिंदे-फडणवीस सरकारच्या काळामध्ये ठाण्यात अनधिकृत इमारतींच्या बांधकामाचं पिक आलं असल्याचं सांगत ठाण्याच्या सर्व बेकायदेशीर इमारतीमध्ये १० टक्के भागिदारी प्रमुख गुन्हेगारांना दिली जात असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
तर ठाण्यात पाहिजे तो बंदुका काढतो, गोळ्या झाडतो, असाही आरोपही जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. ठाण्यातील सर्व बेकायदेशीर इमारतीमध्ये १०-१० टक्के भागिदारी तेथील प्रमुख गुन्हेगारांना दिल्याचंही त्यांनी म्हंटलं आहे.
हे काम करण्यासाठी त्यांनी महानगरपालिकेत एक माणूस बसवला आहे. तो हे सगळं सांभाळत आहे. सध्या ठाण्यात २००-३०० अनधिकृत इमारती बांधल्या जात आहेत असा आरोपही जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
यामधून गुंडगिरी फोफावत असून गुंडांचं आर्थिक सक्षमीकरण होत आहे. मुंबईत एकेकाळी जे गँगवार झालं ते रिअल इस्टेटवरूनच झालं होतं.
ठाण्यातही ५-६ खून झाले आहेत हे खून एखाद्या प्रकल्पात दगड, माती, विटा कोणी टाकायच्या यावरून गोळ्या घालण्यात आल्या, गँगवार झालं आणि ५-६ खून झाले असंही आव्हाड यांनी यावेळी म्हंटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, ठाण्यात एकूणच परिस्थिती हाताबाहेर चालली असून ठाण्यात पाहिजे तो बंदुका काढतो, गोळ्या झाडतो आणि त्याची तक्रारही घेतली जात नाही. पंढरी फडके नावाच्या प्रकरणामध्ये २० जणांना आरोपी करण्यात आलं, मोक्का लावला गेला.
समोरच्या दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला. यानंतर पंढरी फडकेला अटक करण्यात आलं. मात्र, फडकेच्या समोरच्या बाजूच्या लोकांवर गुन्हा नोंदवायला गेले तेव्हा पोलीस म्हणाले नोंदवणार नाही. ही कुठली पद्धत आहे मला कळत नाही,” असंही आव्हाड यावेळी म्हणालेत.
तर मी अनुभवच घेतला आहे. नशिबाने माझ्याबाबत जेव्हा जेव्हा न्यायालयाने भूमिका घेतली तेव्हा सांगितलं की ही केसच नाही. न्यायालयाने अक्षरशः नोंदवून ठेवलं आहे.
यानंतर आणखी वाईट परिस्थिती निर्माण होईल. माझ्यासारखा माणूस या सर्व गोष्टींना उघडपणे विरोध करतो. त्यामुळे आता माझ्या जीवनाची शाश्वतीच नाही असं आव्हाडांनी म्हंटलं आहे.