
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीतून रिकामे झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तातडीने राज्यातील दुष्काळावर लक्ष केंद्रित केले आहे. सांगोला येथील दुष्काळ आढावा दौऱ्यानंतर त्यांनी उद्या (ता. 4) पक्षाच्या प्रमुख नेत्यांची दुष्काळ आढावा बैठक बोलावली आहे.
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीतून रिकामे झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तातडीने राज्यातील दुष्काळावर लक्ष केंद्रित केले आहे. सांगोला येथील दुष्काळ आढावा दौऱ्यानंतर त्यांनी उद्या (ता. 4) पक्षाच्या प्रमुख नेत्यांची दुष्काळ आढावा बैठक बोलावली आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानात या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, शरद पवार राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा तालुकानिहाय आढावा घेणार आहेत.
सध्या पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील अनेक जिल्ह्यांत दुष्काळाचे भीषण सावट आहे. चारा व पाण्याच्या टंचाईने नागरिक त्रस्त आहेत. लोकसभा आचारसंहिता सुरू असल्याने मदत व उपाययोजनेत अडचणी असल्याचे प्रशासनाचे मत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसने दुष्काळात नागरिकांसोबत राहून मदत व उपयायोजनांचे काम हाती घेण्याचा कार्यक्रम तयार केला आहे. उद्याच्या बैठकीत शरद पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दुष्काळ निवारण व उपयोजनांचा कार्यक्रम देतील. त्यानुसार पक्षाचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते दुष्काळी जनतेला दिलासा देण्यासाठी पावसाळ्यापर्यंत सहकार्य करतील, अशी रणनीती आखण्यात आली आहे.
पक्षाच्या नेत्यांनी विश्रांतीसाठी कुठेही जाऊ नये. दुष्काळी जनतेसोबत राहून त्यांची काळजी घेण्यासाठी तत्परता दाखवावी असा हेतू यामागे आहे. प्रचारानंतर शरद पवार उद्या पहिल्यांदाच राज्यातील नेत्यांना भेटत असल्याने निवडणुकीतील मतदानाचाही आढावा घेतील.