राष्ट्रवादीचे आमदार "हयात'मध्ये, तर शिवसेनेचे "लेमन ट्री' हॉटेलात

सकाळ न्यूज नेटवर्क 
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

सत्तानाट्याच्या अंकात घोडेबाजाराला पेव फुटण्याची शक्‍यता असल्याने शिवसेना- राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉंग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीने आपापल्या आमदारांवर बारीक लक्ष ठेवले आहे. त्यांनी भाजपवर घोडेबाजाराचा आरोप केला आहे.

मुंबई - सत्तानाट्याच्या अंकात घोडेबाजाराला पेव फुटण्याची शक्‍यता असल्याने शिवसेना- राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉंग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीने आपापल्या आमदारांवर बारीक लक्ष ठेवले आहे. त्यांनी भाजपवर घोडेबाजाराचा आरोप केला आहे. 

भाजपने राष्ट्रवादीच्या चार आमदारांना डांबून ठेवले आहे, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. भाजपने डांबून ठेवलेल्या आमदारांच्या आम्ही सातत्याने संपर्कात आहोत, ते लवकरच परत येतील असा आमचा विश्वास आहे, असेही ते म्हणाले. राष्ट्रवादीचे 50 आमदार आमच्यासोबत आहेत, असा दावाही त्यांनी केला. 

राष्ट्रवादीचे सर्व आमदार सध्या रेनेसॉं हॉटेलमध्ये आहेत. मात्र मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना सुरक्षेच्या कारणास्तव रेनेसॉं हॉटेलमधील मुक्काम हलवा, असे सांगण्यात आले आहे. त्यानंतर आता हे सर्व आमदार हयात हॉटेलमध्ये राहणार आहेत. 

शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याकडून आमदार फुटू नयेत यासाठी योग्य ती खबरदारी बाळगली जात आहे. यासाठी तिन्ही पक्षांकडून आमदारांना एकत्रित हॉटेलमध्ये ठेवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने त्यांच्या सर्व आमदारांना अंधेरीतील ललित हॉटेलमध्ये ठेवले आहे. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही कारणामुळे शिवसेनेच्या सर्व आमदारांना ललित हॉटेलच्या शेजारी असलेल्या "द लेमन ट्री' या हॉटेलमध्ये ठेवले जाणार आहे, तर कॉंग्रेसचे सर्व आमदार जे. डब्ल्यू. मॅरिऑट हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत.

भाजप इतर पक्षांचे आमदार फोडण्यासाठी जोरदार तयारीत आहे, त्यामुळे घोडेबाजाराला पेव फुटले आहे. 
- अशोक चव्हाण, कॉंग्रेसचे नेते


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ncp mla in hotel hyatt and shivsena mla in hotel lemon tree