अजित पवार सभागृहातच भडकले; जितेंद्र आव्हाडांची 'सिंपल मिस्टेक'

टीम ई-सकाळ
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

विश्वासदर्शक ठरावावेळी दगा फटका होऊ नये म्हणून, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी व्हिप काढला होता. राष्ट्रवादीने बहुमत चाचणी प्रकियेची जबाबदारी अजित पवार यांच्यावर दिली होती.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. उद्धव ठाकरे यांच्या बाजूने 169 मते पडली तर, भाजपनं सभात्याग केल्यामुळं मुख्यमंत्री ठाकरे यांच्या विरोधात केवळ शून्य मतं पडली. बहुमत चाचणी होत असताना अनेक आमदार मत नोंदवताना आपल्या क्रमांक विसरले. काहींना शेजारच्या आमदारांनी त्यांचा नंबर पुन्हा सांगितल्यानंतर त्या आमदारांचं मत नोंदवण्यात आलं. यात जितेंद्र आव्हाड ही नंबर विसरल्यानं आश्चर्य व्यक्त झालं. त्यांना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी नंबर सांगितला. त्यावेळी अजित पवार आव्हाड यांच्यावर चिडल्याचे दिसत होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळ एप

जितेंद्र आव्हाड चुकले 
विश्वासदर्शक ठरावावेळी दगा फटका होऊ नये म्हणून, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी व्हिप काढला होता. राष्ट्रवादीने बहुमत चाचणी प्रकियेची जबाबदारी अजित पवार यांच्यावर दिली होती. सभागृहात जाण्यापूर्वी अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना मार्गदर्शन केलं होतं. सभागृहात बहुमत चाचणी घेताना, प्रत्येक सदस्याला उभं राहून त्याचा मत क्रमांका सांगायचा होता. या हेड काऊंटला मंत्री एकनाथ शिंदे यांच्यापासून सुरुवात झाली. दुसऱ्या रांगेत जितेंद्र आव्हाड होते. आव्हाड यांच्या आधी के. सी. पाडवी यांचा नंबर  15 होता. त्यानंतर आव्हाड यांनी आपल्या नावासह 16 नंबर सांगणे अपेक्षित होते. पण, आव्हाड यांनी 20 नंबर  सांगितला. त्यामुळं पहिल्या रांगेत बसलेले अजित पवार चिडले. विशेष म्हणजे, त्यांच्या चिडण्यामुळं आव्हाड आणखीनच गोंधळले. अजित पवार यांनी 16 नंबर सांगितल्यानंतर आव्हाड यांनी 16 नंबर सांगितला. त्यानंतर हसन मुश्रीफ यांनी 17 नंबर सांगून हेड काऊंट पुढे सुरू केला. 

आणखी वाचा - लढत विधानसभा अध्यक्षपदाची कोण कथोरे? कोण पटोले?

आणखी वाचा - मंगळवारी होणार कर्जमाफीची सर्वांत मोठी घोषणा

आणखी कोण कोण चुकले? 
हेड काऊंटमध्ये 41व्या नंबरवर असताना आमदार कैलास किसनराव यांनी 42 नंबर सांगितला. त्यामुळं पुन्हा गोंधळ उडाला. शेजारी बसलेल्या अमित झनक यांनी त्यांना 41 क्रमांक सांगितल्यानंतर कैलास किसनराव यांनी दुरुस्ती केली. त्यानंतर लगेचच अस्लम शेख रमजान अली यांनी 43 ऐवजी 42 नंबर सांगितला. त्यांना चूक लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी पुन्हा 43 नंबर सांगितला. पुढे राजन साळवी यांनी 57 ऐवजी 56, तर मंगेश कुडाळकर यांनी 62 ऐवजी 63 क्रमांक सांगितला. आमदार बालाजी कल्याणकर यांनी 100 क्रमांकाऐवजी 78 क्रमांक सांगितला. इतर आमदारांनी 100, 100 असा ओरडा केल्यानंतर त्यांनी चूक दुरुस्त केली. चूक सांगितल्याबद्दल त्यांनी थँक्यू म्हणत इतरांचे आभारही मानले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ncp mla jitendra awhad mistake while vote of confidence for cm uddhav thackeray