राष्ट्रवादीची आता 'निर्धार परिवर्तन यात्रा'

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

मुंबई - जनतेच्या दारात जाऊन सरकारच्या गैरकारभारासह निष्काळजीपणाचा लेखाजोखा मांडण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने "निर्धार परिवर्तना'चा या घोषवाक्‍याखाली "परिवर्तन यात्रा' काढण्याची आज घोषणा केली. 10 जानेवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांना रायगडावर अभिवादन करून या यात्रेला सुरवात होईल, अशी घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

ही यात्रा राज्यातील सर्व जिल्ह्यांतून जाणार असून, या यात्रेचा उद्‌देश राज्यातील जनतेला देशातल्या व राज्यातल्या सर्व प्रश्नांची जाणीव करून देण्याचा आहे, ही यात्रा आगामी निवडणुकांत भ्रष्ट व अहंकारी भाजप सरकारच्या परिवर्तनाची नांदी ठरेल, असा विश्‍वास जयंत पाटील यांनी व्यक्‍त केला. या वेळी जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यातील जनतेला घाबरत असल्याची टीका केली.

मुख्यमंत्री जिथे जातात तिथल्या आंदोलन केलेल्या कार्यकर्त्यांना पोलिस स्टेशनमध्ये डांबून ठेवण्याचे आदेश देतात. मंत्रालयात आत्महत्या केलेल्या धर्मा पाटील यांच्या पत्नी व मुलाला धुळे पोलिस कोठडीत ठेवण्याचे काम सरकारने केले. हे मुख्यमंत्री घाबरल्याचे लक्षण असून, आणीबाणीपेक्षाही कठोर या सरकारचे धोरण असल्याची टीका जयंत पाटील यांनी केली. या वेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते.

... वाचाळवीरांना आवरा - अजित पवार
अजित पवार यांनी भाजपच्या बेताल वक्‍तव्य करणाऱ्या नेत्यांवर या वेळी टीका केली. सत्ताधारी पक्षाच्या वाचाळवीरांनी जनतेच्या प्रश्‍नांना बगल देत ज्या पद्धतीने बोलायला सुरवात केली आहे, ते पाहता सरकार जनतेच्या प्रश्‍नाबाबत गंभीर नसल्याचे सिद्ध होते, असे ते म्हणाले. सरकारच्या अपयशी धोरणांना बगल देण्यासाठी राम मंदिर, रिझर्व्ह बॅंक यांसारखे गैरलागू मुद्‌दे समोर करून हे वाचाळवीर दिशाभूल करीत असल्याचा दावा त्यांनी केला.

Web Title: NCP Nirdhar Parivartan Yatra Politics