शिवसेना 'इन'.. राणे 'आऊट'..! 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

कोकणात नवी राजकीय समीकरणे 
सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय घेतल्यानंतर राज्यभरात शिवसेना-भाजपने जल्लोष सुरू केला आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून मराठा आरक्षणाचे शिल्पकार अशी ओळख असलेल्या नारायण राणे यांना आघाडीत घेण्याच्या हालचालींनी वेग घेतला आहे. मराठा समाजात नारायण राणे यांच्याबद्दल सहानुभूती आहे. पहिल्यांदा आरक्षणाचा निर्णय घेण्यात राणे यांच्या समितीचे सर्वाधिक योगदान होते, हे मराठा समाज नाकारत नाही. अशा राजकीय स्थितीत राणे आघाडीत सामील झाले, तर कोकणात नवी राजकीय समीकरणे दिसतील, असा दावा केला जात आहे.

मुंबई : राजकारणात कोणीही कुणाचा कायमचा मित्र अथवा शत्रू नसतो, याचे प्रतिबिंब सध्या राज्याच्या राजकारणात उमटत आहेत. भाजप-शिवसेनेत कमालीचा दुरावा झाल्यानंतर शिवसेनेला कोकणात शह देण्यासाठी भाजपने राणे यांना आपल्या गोटात ओढले होते. कॉंग्रेसच्या विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा द्यायला लावून राणे यांना राज्यसभेवर नेण्यात भाजपने मोलाचा वाटा उचलला होता. पण, आता भाजप व शिवसेनेत चार वर्षांच्या कटूतेनंतर पुन्हा दिलजमाई झाली आहे. त्यामुळे, युतीत पुन्हा शिवसेना "इन' होत असेल, तर शिवसेनेचे कट्टर विरोधक राणे भाजप आघाडीतून "आऊट' होण्याच्या तयारीत असल्याचे संकेत आहेत. 

राणे यांच्यापेक्षा भाजपला शिवसेनेचाच अधिक आधार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, भाजपच्या या राजकीय कुटनितीच्या जाळ्यात अडकलेल्या राणे यांनी पुन्हा कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची वाट धरण्याचे संकेत दिले आहेत. आज शरद पवार यांनी राणे यांची त्यांच्या गावी जाऊन भेट घेतली. त्यापूर्वी काही दिवसांपासूनच राणे राष्ट्रवादीच्या सोबत जाण्याची जोरदार चर्चा होती. कॉंग्रेसमध्ये परतण्याची राणे यांची इच्छा नाही; पण त्यावर सुवर्णमध्य काढण्यात माहीर असलेल्या पवार यांनी राणे यांना राष्ट्रवादीच्या सोबत येण्याचे आवाहन केल्याचे सूत्रांचे मत आहे. राणे यांच्यामुळे रत्नागिरी - सिंधुदुर्ग या लोकसभेसह इतर चार विधानसभा मतदारसंघावर राजकीय समीकरणे बदलू शकतात, अशी अटकळ बांधली जात आहे. 

कोकणात नवी राजकीय समीकरणे 
सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय घेतल्यानंतर राज्यभरात शिवसेना-भाजपने जल्लोष सुरू केला आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून मराठा आरक्षणाचे शिल्पकार अशी ओळख असलेल्या नारायण राणे यांना आघाडीत घेण्याच्या हालचालींनी वेग घेतला आहे. मराठा समाजात नारायण राणे यांच्याबद्दल सहानुभूती आहे. पहिल्यांदा आरक्षणाचा निर्णय घेण्यात राणे यांच्या समितीचे सर्वाधिक योगदान होते, हे मराठा समाज नाकारत नाही. अशा राजकीय स्थितीत राणे आघाडीत सामील झाले, तर कोकणात नवी राजकीय समीकरणे दिसतील, असा दावा केला जात आहे.

Web Title: NCP president Sharad Pawar meet BJP MP Narayan Rane