बहुजन समाजात फूट पाडण्याचा राज्यकर्त्यांचा डाव: शरद पवार 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 12 ऑगस्ट 2018

आरक्षणासाठी वैधानिक प्रक्रियेच्या पूर्ततेला काही वेळ लागणार आहे. त्यासाठी शांतता आवश्‍यक आहे, असाही सल्ला पवार यांनी दिला आहे. तसेच राज्यघटनेने ज्यांना आरक्षण दिले आहे, त्याला धक्का न लावता मराठा आरक्षणाचा निर्णय झाला पाहिजे, अशी भूमिकादेखील पवार यांनी स्पष्ट केली आहे. 

नवी दिल्ली : राज्यकर्ते व हितसंबंधी घटक या आंदोलनाला बदनाम करणे, तसेच मराठा आणि अन्य बहुजन समाजात फूट पाडण्याचा डाव खेळत आहेत, असे टीकास्त्र सोडताना पवार यांनी म्हटले आहे की, मराठाला इतर समाजांपासून वेगळे व एकाकी पाडण्याचा राज्यकर्त्यांचा प्रयत्न आहे आणि त्यांची ही योजना यशस्वी होऊ देता कामा नये, याची पक्की खूणगाठ आंदोलकांनी ठेवली पाहिजे. सत्ताधाऱ्यांच्या या खेळीला आंदोलकांनी बळी पडू नये. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून हे आंदोलन केले जात आहे, त्या छत्रपतींनी अठरापगड जातींना, बारा बलुतेदारांना बरोबर घेऊन आदर्श स्वराज्य निर्माण केले होते. त्या आदर्शांना धक्का लागेल, असे आचरण आपल्या हातून घडणार नाही, याचीही खबरदारी आंदोलनकर्त्यांनी घ्यावी, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.

मराठा आंदोलनकर्त्यांनी शांततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. सर्वसामान्य, बहुजनांचा पाठिंबा आणि सदिच्छा टिकवाव्यात. तसेच औद्योगिक क्षेत्रास आंदोलनाची झळ पोचणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन शरद पवार यांनी आज येथे केले.

आरक्षणासाठी वैधानिक प्रक्रियेच्या पूर्ततेला काही वेळ लागणार आहे. त्यासाठी शांतता आवश्‍यक आहे, असाही सल्ला पवार यांनी दिला आहे. तसेच राज्यघटनेने ज्यांना आरक्षण दिले आहे, त्याला धक्का न लावता मराठा आरक्षणाचा निर्णय झाला पाहिजे, अशी भूमिकादेखील पवार यांनी स्पष्ट केली आहे. 

आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात झालेल्या आंदोलनाला लागलेले हिंसक वळण या पार्श्‍वभूमीवर शरद पवार यांनी निवेदनाद्वारे शांततेचे आवाहन केले. मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांना जबाबदारीने वागण्याचा सल्ला देताना सत्ताधाऱ्यांच्या राजकीय डावपेचांवरही पवार यांनी टीकास्त्र सोडले. 

पवार यांनी निवेदनात म्हटले आहे की, मराठा आरक्षणाच्या मागणीला कोणाचीच हरकत नाही; परंतु कोणताही पूर्वग्रह न ठेवता स्वच्छ मनाने आणि राज्यघटनेने ज्यांना आरक्षण दिले आहे, त्याला धक्का न लावता मराठा आरक्षणाचा निर्णय झाला पाहिजे. त्याचप्रमाणे हिंसा, जाळपोळ, दंगे व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याचे प्रकार सक्तीने टाळले गेले पाहिजेत. आतापर्यंत शांततेने पार पडलेल्या मराठा आंदोलनाला सर्वसामान्यांचा व बहुजनांचा पाठिंबा आणि सदिच्छा प्राप्त झाल्या. त्याला धक्का लागेल, असे प्रकार होणार नाहीत याची खबरदारी सर्व संबंधितांनी घेतली पाहिजे. 
गोखले अर्थ-राज्यशास्त्र संस्थेच्या सर्वेक्षणातून पुढे आलेल्या मराठा समाजाच्या खालावलेल्या आर्थिक स्थितीकडे लक्ष वेधताना पवार यांनी म्हटले आहे की, गोखले अर्थ-राज्यशास्त्र संस्थेने शेतकरी आत्महत्यांच्या संदर्भात केलेल्या पाहणीत मराठा समाजाबद्दलची विदारक स्थिती मांडण्यात आली आहे. कुटुंबाच्या विस्तारानुसार जमिनीचे लहान लहान तुकडे पडत गेल्याने शेती किफायतशीर राहिलेली नाही. यातून आलेल्या आर्थिक हलाखीमुळे पुरेसे शिक्षण नाही आणि नोकऱ्याही नाहीत. अशा दुष्टचक्रात तरुण सापडला आहे. वर्षांनुवर्षाच्या या वंचनेमुळे मराठा समाजात व विशेषतः युवकांच्या मनात राग साठणे नैसर्गिक असले तरी, जाळपोळ, दगडफेक करणे किंवा आत्महत्या करणे, हा मार्ग नक्कीच नाही. 

आंदोलन थांबविण्याच्या घोषणेबद्दल मराठा क्रांती मोर्चाचेही पवार यांनी अभिनंदन केले. यासंदर्भात पवार यांनी निवेदनात म्हटले आहे की, एखादे आंदोलन सुरू केल्यानंतर कोठे थांबावे, याचा विचार करायचा असतो. हा विचार केल्याबद्दल अभिनंदन. आरक्षणाच्या मागणीच्या पुर्ततेसंदर्भात काही वैधानिक प्रक्रियेची आवश्‍यकता आहे. यासाठी उचित वेळ आवश्‍यक आहे. त्यापुढे आरक्षणाच्या अंमलबजावणीसंदर्भात लागणारा वेळ, राज्य शासन आणि विधिमंडळातील प्रक्रिया आवश्‍यक आहे. त्यासाठी शांतता हवी आहे. तसेच राज्यातील औद्योगिक क्षेत्रास आंदोलनाची झळ पोचणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. अशा आंदोलनाने राज्यातील उद्योगधंद्यातील गुंतवणूक थांबेल व बेरोजगारीचा प्रश्‍न अधिक गंभीर होईल. म्हणूनच मराठा आंदोलनकर्त्यांनी शांततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे.

Web Title: NCP president Sharad Pawar talked about Maratha Kranti Morcha