मुख्यमंत्र्यांच्या दालनासमोर राष्ट्रवादी कॉंग्रेसची "कांदाफेक' 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 4 मे 2017

मुंबई - बळिराजा शेतकरी संघटनेच्या मंत्रालयासमोरील आंदोलनाला चोवीस तास उलटत नाहीत, त्यापूर्वीच बुधवारी थेट मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्र्यांच्या दालनाच्या समोरच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिलांनी "कांदाफेक' आंदोलन केले. 

मुंबई - बळिराजा शेतकरी संघटनेच्या मंत्रालयासमोरील आंदोलनाला चोवीस तास उलटत नाहीत, त्यापूर्वीच बुधवारी थेट मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्र्यांच्या दालनाच्या समोरच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिलांनी "कांदाफेक' आंदोलन केले. 

अत्यंत काटेकोर सुरक्षा यंत्रणा असतानाही राष्ट्रवादीच्या पंधरा ते वीस महिलांनी थेट मंत्रालयात जाऊन आंदोलन केल्याने पोलिस प्रशासन हवालदिल झाले आहे. आज दुपारी मुख्यमंत्री मंत्रालयातील त्यांच्या दालनात होते. त्याचवेळी सहाव्या मजल्यावर मुंबई महिला "राष्ट्रवादी'च्या अध्यक्षा सुरेखा पेडणेकर व दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्षा पुष्पा हरियाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. 

शेतकऱ्यांच्या कांद्याला रास्त भाव मिळत नाही. व्यापाऱ्यांच्या अरेरावीमुळे खरेदी बंद आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना चढ्या भावाने कांदा खरेदी करावा लागत असल्याचा निषेध म्हणून हे आंदोलन करण्यात आले. 

महिला कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या दालनासमोर कांदे फेकत सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी केली. महिलांनी अचानक आंदोलन सुरू केल्याने सहाव्या मजल्यावरील सुरक्षाव्यवस्थेची धावपळ उडाली. आंदोलनकर्त्या महिलांना अखेर ताब्यात घेत त्यांना मरिन लाइन पोलिस स्थानकामध्ये नेण्यात आले. अशाप्रकारे मंत्रालयात आंदोलन झाल्याने सुरक्षा यंत्रणेबाबत चर्चा सुरू झाली आहे. मंत्रालयाच्या समोर आंदोलन होत असताना आता अचानक मंत्रालयात देखील आंदोलनकर्ते धडकल्याने मंत्रालयाची सुरक्षा अधिक काटेकोर होण्याची शक्‍यता आहेत. या महिलांनी कांदे आत कसे नेले याची चौकशी सुरू झाली आहे. 

Web Title: NCP Women Kandfak agitation