व्हाॅट्सअपव्दारे पिकांचा पंचनामा; महिला प्रदेशाध्यक्षांना धक्का !

निखिल सूर्यवंशी
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर शुक्रवारी धुळे जिल्हा दौ-यावर होत्या. त्यांनी अतिवृष्टीग्रस्त बळीराजाच्या बांधावर जाऊन त्याला धार देण्याचा प्रयत्न केला. 

धुळे : अतिवृष्टीतील नुकसानग्रस्त पिकांचा व्हाॅट्सअपव्दारे पंचनामा होऊ शकतो का? तर होय, होऊ शकतो. जिल्ह्यातील बळसाणे येथील तलाठी महोदयांनी ही करामत करून दाखवली आहे. दौ-यात ते पाहून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांना धक्काच बसला. या अजब प्रकाराची पोलखोल करत त्यांनी सरकारी यंत्रणेच्या कारभाराचा पंचनामाच केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर शुक्रवारी (ता. 15) जिल्हा दौ-यावर होत्या. त्यांनी देशभरातील जैन धर्मियांचे तिर्थक्षेत्र असलेल्या बळसाणे (ता. साक्री, जि. धुळे) येथे दुपारनंतर भेट दिली. 

परतीच्या पावसासह अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निरनिराळ्या पिकांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर चाकणकर यांनी बळसाणेसह विविध गावातील पीडित शेतकरी व समस्याग्रस्त ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यावेळी जागोजागी अतिवृष्टीमुळे शेतमालाचे झालेले नुकसान आणि त्यामुळे हतबल झालेल्या शेतक-यांसह ग्रामस्थ महिलांशी त्यांनी संवाद साधत बळीराजाला दिलासा दिला.

बळसाणे येथे तलाठ्याने नुकसानग्रस्त शेतात जाऊन पिकांचा पंचनामा करण्याऐवजी चक्क व्हाॅटस्अपवर "पंचनामा ग्रुप, बळसाणे",  असा ग्रुप सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार  चाकणकर यांच्या दौ-यात उजेडात आला. त्या ग्रुपमध्ये शेतकऱ्यांनी आपल्या नुकसानग्रस्त शेताचे व पिकाचे फोटो पोस्ट करायचे, अशी अनाकलनीय करामत तलाठ्याने केली. राज्यात असा अजबच प्रकार येथे पहायला मिळाल्याने चाकणकर खुपच संतापल्या.

विविध कारणांनी रोज संकटाशी मुकाबला करणार्या शेतकर्यांच्या शेतात जाऊन पंचनामा करण्याऐवजी तलाठ्याने ही कोणती पद्धत अंमलात आणली आणि त्याचे असे धाडस कशामुळे झाले, असा प्रश्न चाकणकर यांना पडला.

तसेच ज्या शेतक-यांकडे मोबाईलच नसेल त्याने फोटो कसे पोस्ट करायचे, त्याच्या नुकसानग्रस्त पिकाचा पंचनामा कसा होऊ शकेल, संबंधित पीडित शेतक-याला कसा न्याय मिळेल, असे संतप्त प्रश्न उपस्थित करत चाकणकर यांनी स्थानिक सरकारी यंत्रणेला धारेवर धरले. त्यांनी प्रशासनाने थेट बांधावर जाऊन पंचनामे करावे, असे सुचविले. 

या संदर्भात पीडित शेतक-यांच्या न्यायासाठी पक्षाचे सर्वेसर्वा माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्यासह राज्यपालांकडे तक्रार करणार असल्याचे चाकणकर यांनी  'सकाळ'शी बोलताना सांगितले. त्यांनी स्थानिक प्रशासनाच्या अशा विचित्र कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ncp women wing president rupali chakankar criticize government policy