नीट परीक्षेसाठी महाराष्ट्रात आणखी चार केंद्रे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मार्च 2017

देशभरात 23 नवीन केंद्र; 11 लाख विद्यार्थी देणार परीक्षा 

नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मागील वर्षापेक्षा यंदाच्या वर्षी 41.42 टक्‍यांनी वाढ झाली आहे.

सोलापूर : वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या नीट या परीक्षेच्या केंद्रांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. वाढ केलेल्या परीक्षा केंद्रांमध्ये महाराष्ट्रातील चार नव्या केंद्राचा समावेश आहे. यात अहमदनगर, अमरावती, कोल्हापूर व सातारा यांचा समावेश आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने CBSE नव्या केंद्राची माहिती आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. 

संपूर्ण देशात CBSE च्या वतीने 7 मे रोजी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. देशभरातून 11 लाख 35 हजार 104 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. मागील वर्षी 8 लाख 2 हजार 594 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मागील वर्षापेक्षा यंदाच्या वर्षी 41.42 टक्‍यांनी वाढ झाली आहे. नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये यंदाच्या वर्षी मोठी वाढ झाल्याने 23 नव्या केंद्राची वाढ करण्यात आली आहे. मुंबई, नागपूर, ठाणे, पुणे, नाशिक येथेही नीट परीक्षा घेण्यात येणार असल्याचे यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. नव्या 23 केंद्राची वाढ झाल्यामुळे देशभरातील एकूण 103 शहरात ही परीक्षा होणार आहे. 

सोलापूरला परीक्षा केंद्र नाहीच 
शासनाने परीक्षा केंद्र वाढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर सोलापूर शहराला सुद्धा परीक्षा केंद्र मिळण्याची अपेक्षा होती. मात्र CBSEने जाहीर केलेल्या 23 शहरात सोलापूरचे नाव नाही. कर्नाटकातील गुलबर्गा, महाराष्ट्रातील कोल्हापूर, पुणे ही शहरे सोलापुरातील विद्यार्थ्यांसाठी सोयीचे आहेत. 

Web Title: NEET exam centers increased across india