आत्मविश्‍वास, परिश्रम यशाची गुरुकिल्ली

आत्मविश्‍वास, परिश्रम यशाची गुरुकिल्ली

नांदेड - वैद्यकीय शाखेला जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणजे, प्रत्यक्ष परीक्षेचा दिवस. यंदा हा दिवस पाच मे २०१९ असा निश्‍चित केलेला आहे. एव्हाना प्रवेश पत्र (ॲडमीटकार्ड) तुमच्या हातात पडलेले असेल. आयुष्याला वळण देणाऱ्या या परीक्षेची तयारी खूप आधीपासूनच विद्यार्थ्यांनी सुरू करावयाची आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा कस त्या दिवशी लागणार असल्याने शांतचित्ताने, उत्साहाने, आत्मविश्वासाने आणि गांभीर्याने प्रत्येकाने परीक्षेला सामोरे जावे.

...असा करावा अभ्यास 
पूर्वी सांगितल्याप्रमाणे ही परीक्षा ‘पेन-पेपर’ अर्थात ऑफलाइन स्वरूपाची असेल. सर्व प्रश्न बहुपर्यायी (ऑब्जेक्‍टीव्ह) स्वरूपाचे असतील. परीक्षेचा कालावधी तीन तासांचा असेल. परीक्षेत एकूण १८० प्रश्न विचारले जाणार असून, प्रत्येक प्रश्नाच्या अचूक उत्तराला चार गुण मिळतील. अशा रितीने ही परीक्षा एकूण ७२० गुणांची असेल. चार पर्यांयांपैकी योग्य पर्यायावरील वर्तुळ पेनने भरावयाचे आहे. या परीक्षेत एका चुकीच्या उत्तरासाठी एक गुण वजा केला जाणार (निगेटिव्ह मार्किंग) आहे. त्यामुळे एका चुकीच्या उत्तराचा एक गुण आणि त्याला मिळू शकणारे चार, असे पाच गुण वजा होतील. त्यामुळे प्रश्नांचे उत्तर चुकूच नये, याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ही प्रश्नप्रत्रिका हिंदी, इंग्रजी, उर्दू, मराठी, गुजराथी अशा अकरा भाषांतून असणार आहे. या परीक्षेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र यांचे प्रत्येकी ४५ आणि जीवशास्त्राचे ९० (प्राणिशास्त्र आणि वनस्पतिशास्त्र मिळून) असे एकूण १८० प्रश्न (एकूण गुण ७२०) विचारले जातील. 

सर्वच प्रश्‍न सोडवण्याची घाई नको
हे सर्व प्रश्न तीन तासांत सोडवायचे आहेत. मात्र, सर्वच्या सर्व प्रश्न सोडवायचेच, अशी घाई करू नका. घाईमुळे घात होऊ शकतो. ज्या प्रश्नांची उत्तरे दिली जातील ती १०० टक्के बिनचूक असतील, याची खात्री बाळगूनच पुढच्या प्रश्नाकडे वळा. १८० पैकी १३० प्रश्न तुम्ही बिनचूकपणे सोडविले तरीसुद्धा तुम्ही या परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकता. किमान ७५ प्रश्न जीवशास्त्राचे (प्राणिशास्त्र आणि वनस्पतिशास्त्र मिळून), २५ रसायनशास्त्राचे आणि २५ भौतिकशास्त्राचे सोडवायलाच हवेत. या परीक्षेत सर्वांत मोठे यश मिळविणारा टॉपर्सही काही प्रश्न सोडून देतो, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. 
विद्यार्थ्याने दोन वर्षे केलेल्या मेहनतीला फळ येण्याचा दिवस म्हणजे परीक्षेचा दिवस. परीक्षा हॉलमध्ये प्रवेश करताच आपली जागा पटकवा. बसण्याची व्यवस्था, आजूबाजूला कसला कागद अथवा इतर काही पडलेले नाही ना, याची खात्री करा. परीक्षकांच्या सूचनांकडे लक्ष द्या. हॉलमधील इतर उमेदवारांकडे बघण्याचे शक्‍यतो टाळा. आपला पेपर व आपण एवढाच विचार करा. इतरांच्या कृतीचा परिणाम आपल्यावर होण्याची शक्‍यता असते. प्रश्नपत्रिका हाती पडताच ती शांतपणे संपूर्ण वाचा. त्यातील प्रश्न सोडविण्याच्या वेळेचे योग्य नियोजन आधीच करा. प्रश्न नीट वाचतानाच त्यांचे पर्याय वाचावेत. केवळ बघणे व वाचणे, यात फरक असतो. जे प्रश्न सहज सोडवता येतात, ते आधी सोडवा. मगच अवघड किंवा गोंधळ निर्माण करणारे प्रश्न हातात घ्या. परीक्षेत आपली मानसिक स्थिती उत्तमच हवी. ती ठीक नसेल, तर २५ ते ३० गुणांवर परिणाम होतो, याची जाणीव ठेवा.
- प्रा. डॉ. महेश पाटील, संचालक, आयआयबी प्रा. लि., नांदेड

परीक्षेसाठी काही टिप्स...

    परीक्षेच्या आधी थोडे रिलॅक्‍स व्हा. या काळात पाणी भरपूर प्या. फळांचे सेवन करा. पचायला जड अन्न खाऊ नका.
    स्मार्टपणे प्रश्नपत्रिका सोडवा. एकाच प्रश्नाभोवती फार रेंगाळू नका. येत नसेल, तर तो प्रश्न सोडून द्या किंवा नंतर वेळ असेल, तर सोडवायला घ्या.
    प्रत्येक प्रश्नानंतर ओएमआर फिलिंग (योग्य उत्तराचे गोल वर्तुळ भरणे) तुमचा वेळ खाऊ शकते. त्यामुळे प्रत्येक १० ते २० प्रश्नांनंतर तुम्ही योग्य उत्तराच्या पर्यायावर खूण केलेली वर्तुळे योग्य पद्धतीने भरून घ्या.
    या परीक्षेसाठी ठरलेला ड्रेसकोडच वापरा. परीक्षेस अपात्र ठरेल, अशी कोणतीही कृती करू नका.
    आधी धोरण निश्‍चित करा, मगच प्रश्नपत्रिका सोडवा. भौतिकशास्र, रसायनशास्त्र वेळखाऊ आहेत. ते नंतर सोडवा. आधी जीवशास्त्राचे प्रश्‍न सोडवा, मग रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र असा क्रम ठेवावा. अर्थात, हा ज्याच्या त्याच्या आवडीचाही भाग आहे. 
    तज्ज्ञांच्या मते इतर सर्व विषयांच्या तुलनेत जीवशास्त्र सोडवायला सर्वांत सोपे असते. अनेक विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र अवघड जाते. हा अनुभव लक्षात घेता आपणही तशीच तयारी ठेवावी.
    सतत प्रेरणादायी, उत्साही राहा. निराश होऊ नका. सकारात्मकता बाळगा. नकारात्मक विचारांना जवळही फिरकू देऊ नका. मगच आपण ही परीक्षा नीट देऊ शकता.

(क्रमशः)  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com