खेड जमीनप्रकरणी अब्रुनुकसानीचा दावा - कदम

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 29 एप्रिल 2017

मुंबई - विरोधी पक्षनेतेपदी असताना पदाचा गैरवापर करत सरकारी अधिकाऱ्यांवर दबाव टाकून योगिता दंत महाविद्यालयासाठी जमीन बळकावल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्यावर करण्यात आला. खेड येथील ज्येष्ठ नागरिक आत्माराम भुवड यांनी हा आरोप करीत उपोषणाचा इशारा दिला होता. या संदर्भात रामदास कदम यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत भुवड यांच्यासह आपली बदमानी करणाऱ्यांवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचा इशारा दिला.

आत्माराम भुवड हे मूळचे रत्नागिरी येथील खेडचे रहिवासी आहेत. त्यांनी कदम यांच्यावर आरोप करत आपल्या न्यायासाठी उपोषणाचा इशारा देखील दिला आहे. कदम हे राज्याचे पर्यावरणमंत्री, तसेच शिवसेनेचे नेते असल्याने भुवड यांनी त्यांच्या विरोधात कायद्याची लढाई सुरू केली आहे. भुवड कुटुंबाची खेडमध्ये असलेली 41 गुंठे जमीन रामदास कदम यांनी हडपल्याचा धक्कादायक आरोप त्यांनी केला. खेडमध्ये रामदास कदम यांचे योगिता दंत महाविद्यालय आहे, तर त्यालगतच शिवतेज आरोग्य सेवा संस्थेने वसतिगृह उभारले आहे. मात्र, या दंत विद्यालय आणि वसतिगृहासाठी भुवड यांनी आपली जमीन बळकावण्यात आल्याचा आरोप केला आहे. या संदर्भात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि कॉंग्रेस आमदार नितेश राणे यांनी आज कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

आत्माराम भुवड यांचे सर्व आरोप रामदास कदम यांनी आज फेटाळले. भुवड सांगत असलेल्या जमिनीबाबत माझा काहीही संबंध नाही. सर्वे क्रमांक "45-1 अ' यावर इमारत उभी असून ही जमीन 2005 मध्ये आपण विकत घेतली. या वेळी कदम यांनी जमिनीचा सात-बारा उतारा माध्यमांना दाखवला. या जमिनीसंदर्भात भुवड यांनी न्यायालयात याचिका दाखल केली असता दोन वेळा ती फेटाळल्याची माहिती कदम यांनी दिली. मात्र, त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण केले जात आहे. या सर्वांच्या विरोधात अवमान याचिका दाखल करणार असल्याचे सांगून संबंधित कागदपत्रे मुख्यमंत्री आणि धनंजय मुंडे यांच्याकडे पाठवणार असल्याचे कदम म्हणाले.

Web Title: negligence claim in Khed land proceedings