नव्या आघाडीसाठी आणखी एक पाऊल

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

बेरोजगारीवर चर्चा
दरम्यान, राज्यातील बेरोजगारीबाबत या बैठकीत गंभीर चर्चा करण्यात आली. राज्यातील युवकांच्या हाताला काम मिळावे, यासाठी ठोस कार्यक्रम आखण्यात येणार आहे. दरवर्षी किमान पन्नास हजार ते एक लाख बेरोजगारांना रोजगार मिळेल यासाठी कृषिपूरक उद्योग, लघुउद्योग, बचतगटांचे सक्षमीकरण आणि मोठ्या उद्योगांसोबत समन्वय साधणारी यंत्रणा निर्माण करण्यावर चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. या बैठकांचे सत्र अशाच प्रकारे सुरू राहणार असून पुढील दोन दिवसांत नव्या आघाडीचा किमान समान कार्यक्रमाचा मसुदा अंतिम होईल, असा दावाही सुत्रांनी केला आहे.

राजकीय आघाडीवर
    राष्ट्रपती राजवट गरीब रुग्णांच्या मुळावर
    भाजपचे पक्षपातळीवर विचारमंथन सुरू
    नव्या समीकरणांचा भाजपलाच तोटा
    ‘एसटी’ची सूत्रे प्रधान सचिवांकडे
    दोन दशकांत रिपाइंला एकच राज्यमंत्रिपद
    विधानसभेत घराणेशाहीचा बोलबाला

मुंबई - राज्यात सत्तास्थापनेसाठी पुढाकार घेतलेल्या  शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नव्या संभाव्य आघाडीने किमान समान कार्यक्रमाच्या आखणीसाठी कंबर कसली आहे. शेतकरी कर्जमाफी व बेरोजगारीच्या उपाययोजनांना सर्वोच्च प्राधान्यक्रम मिळणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. आज या तिन्ही पक्षांच्या नेत्यांचा समावेश असलेल्या समन्वय समितीची वांद्रे येथील अज्ञात स्थळी बैठक झाली. सुमारे चार तास झालेल्या या बैठकीत किमान समान कार्यक्रमावर सखोल चर्चा करण्यात आली.

या बैठकीला शिवसेनेचे नेते सुभाष देसाई व एकनाथ शिंदे उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून जयंत पाटील, छगन भुजबळ व नवाब मलिक, तर काँग्रेसच्या वतीने पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे आणि विजय वडेट्टीवार आदी उपस्थित होते. आज या तिन्ही पक्षांच्या जाहीरनाम्यातील घोषणांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या तिन्ही जाहीरनाम्यातील समान दुवे असणाऱ्या योजना एकत्रित करून त्यावर ठोस उपाययोजना करण्यासाठीचा आराखडा तयार करण्यास आज सुरुवात झाली आहे. 

राज्यातला शेतकरी दुष्काळासोबतच व अवकाळी पावसाने उद्‌ध्वस्त झाला आहे. फळबागांचे झालेले नुकसान चिंताजनक आहे. त्यामुळे लहान, अल्पभुधारक व कोरडवाहू शेतकऱ्यांसह फळबागायतदारांना कर्जमाफीच्या कक्षेत घेण्याचा मानस किमान समान कार्यक्रमात अंतर्भूत करण्याची तयारी सुरू असल्याचे कळते. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानभरपाईसाठी हेक्‍टरी २५ हजार रुपयांपर्यंत मदत करण्यासाठीही या समन्वय समितीमध्ये चर्चा सुरू असून मदतीचा आकडा अद्याप निश्‍चित झालेला नाही. 

काँग्रेस व राष्ट्रवादीची सरसकट कर्जमाफीची भूमिका होती, तर सातबारा कोरा करण्याची घोषणा शिवसेनेने दिली होती. त्यामुळे, कर्जमुक्‍त शेतकरी करण्याच्या दिशेने या नव्या आघाडीत सखोल चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात येते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याआड अदृश्‍य शक्ती काम करत आहे, ‘मातोश्री’मध्ये बंद दाराआड झालेल्या चर्चेचा तपशील मोदींपर्यंत पोचविलाच गेला नाही.
- संजय राऊत, नेते शिवसेना

शिवसेनेने कोणत्याही पर्यायाचा फारसा विचार न करता भाजपसोबतच सत्ता स्थापन करावी, भाजपनेही राज्याच्या हितासाठी तडजोड करावी. 
- रामदास आठवले, अध्यक्ष रिपाइं

शिवसेनेला पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये स्थान मिळण्याची शक्‍यता कमी आहे, संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांचे जोसेफ गोबेल्स आहेत.
- राम माधव, नेते भाजप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: new aghadi shivsena congress ncp government politics