युतीच्या जागावाटपात भाजपचा वरचष्मा; फिफ्टी-फिफ्टी नाही असा असेल फॉर्म्युला?

युतीच्या जागावाटपात भाजपचा वरचष्मा; फिफ्टी-फिफ्टी नाही असा असेल फॉर्म्युला?

मुंबई ः भाजपच्या वाट्याच्या 135 जागा, भाजपला पाठिंबा दिलेले आठ आमदार आणि मित्रपक्षांना सोडण्यात येणाऱ्या 10 जागा मिळून 153 जागा युतीच्या जागावाटपात भाजपकडे येणार आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या वाट्याला 135 जागा येणार असून, फिप्टी-फिप्टी फॉर्म्युल्यावर पाणी फेरणार असल्याचे चित्र आहे. 

आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने फिप्टी-फिप्टी जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार शिवसेना 144, तर भाजप 144 जागा लढणार असल्याचे शिवसेनेकडून सातत्याने सांगण्यात येत आहे. मात्र, भाजपचे अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या बैठकीत दोन्ही पक्षांकडून प्रत्येकी 135 जागा लढविण्यात येणार असून, उर्वरित जागा सरकारला पाठिंबा दिलेले अपक्ष आमदार आणि मित्रपक्षांना सोडण्याबाबत शिक्‍कामोर्तब झाल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

सरकारला पाठिंबा दिलेले आठ अपक्ष आमदार, तसेच विनायक मेटे यांचा शिवसंग्राम आणि रामदास आठवले यांचा रिपाइं पक्ष भाजपसोबत आहेत. त्यामुळे या अठरा जागाही भाजपच्या कोट्यात असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. म्हणजेच चंद्रकांत पाटील यांच्या म्हणण्यानुसार भाजपकडे 153, तर शिवसेनेच्या वाट्याला 135 जागा येणार असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे युतीच्या फिप्टी-फिप्टी फॉर्म्युल्यावर पाणी फेरणार असल्याचे चित्र आहे. 

शिवसेनेच्या दिग्गजांची होणार कोंडी 
सन 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप 122, तर शिवसेनेने 63 जागा जिंकल्या होत्या. जागावाटप फॉर्म्युल्यात या जागा त्या त्या पक्षांकडे कायम राहणार आहेत. त्यामुळे शिवसेना नेते सुभाष देसाई, विनोद घोसाळकर यांच्यासारख्या दिग्गजांना मतदारसंघच मिळणार नाहीत. मुंबई, ठाणे, पुण्यासारख्या शहरातील जागांवरही भाजपच वरचढ ठरणार आहे.

जागावाटपात काही ठिकाणी देवाण-घेणार होणार असल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे. कारण शिवसेनेची ताकद असणारे मतदारसंघही मोदी लाटेत भाजपने जिंकले असून, सध्या मोदी लाट नसल्याने काही जागांची अदलाबदल होईल, असे शिवसेनेचे नेते सांगत आहेत. मात्र, या मुद्यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, की यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही मोदी लाट कायम असल्याचे दिसून आल्याने भाजपच्या विद्यमान जागा आमच्याकडेच राहतील. त्यामुळे भाजपने जिंकलेल्या काही जागांवर शिवसेनेने डोळा ठेवला असला, तरी शिवसेनेचे ते दिवास्वप्नच ठरणार असल्याचे पाटील यांच्या वक्‍तव्यावरून स्पष्ट होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com