'ठाकरे'शाही

सकाळ न्यूज नेटवर्क 
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

राज्यभरातील शिवसैनिक ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण आज वीस वर्षांनंतर प्रत्यक्षात आला. आकाशातील सूर्य मावळतीला जात असताना शिवसेनेचा सत्तासूर्य उगवला. राज्य आणि देशभरातील दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

मुंबई - ‘‘मी उद्घव बाळासाहेब ठाकरे, ईश्‍वरसाक्ष शपथ घेतो की...’’  हा आवाज शिवाजी पार्कवर घुमताच उपस्थित हजारो शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. राज्यभरातील शिवसैनिक ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण आज वीस वर्षांनंतर प्रत्यक्षात आला. आकाशातील सूर्य मावळतीला जात असताना शिवसेनेचा सत्तासूर्य उगवला. राज्य आणि देशभरातील दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्या रूपाने ठाकरे घराण्यातील पहिलीच व्यक्ती मुख्यमंत्रिपदी विराजमान झाली आहे. उद्धव यांच्यासह अन्य सहा नेत्यांचा शपथविधीही या वेळी पार पडला.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

उद्धव यांच्यासह शिवसेनेचे एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, छगन भुजबळ आणि काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांचाही शपथविधी या वेळी पार पडला. राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. उद्धव हे राज्याचे २९वे मुख्यमंत्री बनले. त्यांच्या रूपाने शिवसेनेचा तिसरा नेता आज मुख्यमंत्रिपदी विराजमान झाला. राज्यातील अभूतपूर्व अशा सत्तानाट्यानंतर आजअखेर शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार सत्तारूढ झाले. आजच्या शपथविधी सोहळ्यासाठी शिवाजी पार्कवर जय्यत तयारी करण्यात आली होती. राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले होते. प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या संकल्पनेतून शिवराज्याभिषेकाच्या धर्तीवरच शपथविधी सोहळ्याचा भव्यदिव्य असा सेट तयार करण्यात आला होता. मुंबईच्या कानाकोपऱ्यामध्ये उद्धव यांच्या स्वागताचे पोस्टर झळकले होते. प्रत्यक्ष शिवाजी पार्कवर शपथविधी सोहळ्यास्थळी उद्धव यांचे आगमन होताच शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला.

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारच्या घडामोडी एका क्लिकवर

यांचा नामोल्लेख
उद्धव यांनी आई-वडिलांच्या स्मृतींना स्मरून शपथ घेतली, तर एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे नाव घेत शपथ घेतली. सुभाष देसाई यांनीही बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेतले. राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी वडिलांसोबत आईचेही नाव घेतले तसेच शरद पवार यांच्या नावाचाही त्यांनी उल्लेख केला. छगन भुजबळ यांनी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना अभिवादन करीत आणि शरद पवार यांचे नाव घेत शपथ घेतली.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन! राज्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी ते अधिक परिश्रम घेतील, याचा मला पूर्ण विश्‍वास आहे.
नरेंद्र मोदी, पंतप्रधान

हे सरकार पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करणार असून, समाजविकास कार्यक्रमाच्या आधारे राज्यातील सर्व घटकांना न्याय देण्यात येईल. सर्वसंमतीने निर्णय घेऊन हे सरकार सर्वसमावेशक कारभार करेल.
- सोनिया गांधी, अध्यक्षा, काँग्रेस


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New Government In Maharashtra thackeray Sarkar