असे असेल नववर्ष...

दीपक शेलार
शनिवार, 29 डिसेंबर 2018

नववर्ष हे लीप वर्ष नसल्याने 365 दिवसांचेच राहणार आहे. 2019 या नूतनवर्षात तीन सूर्यग्रहणे, दोन चंद्रग्रहणे अशी एकूण पाच ग्रहणे होणार असून, त्यापैकी 16 जुलैचं खंडग्रास चंद्रग्रहण आणि 26 डिसेंबरचे कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातून दिसणार असल्याने खगोलप्रेमींसाठी पर्वणी आहे. 

ठाणे : सरत्या वर्षाला निरोप देताना अनेक कटूगोड आठवणींना उजाळा दिला जात आहे. तर आता येत्या मंगळवारपासून सुरू होणाऱ्या नववर्षात काय होणार आहे याची उत्सुकता प्रत्येकालाच आहे. 2019 मध्ये फक्त तीनच सुट्ट्या रविवारी येत असल्यानं सुट्ट्यांची चंगळच चंगळ असेल. तसेच, तब्बल नऊ महिने विवाहाचे मुहूर्त असल्याने विवाहोच्छुकांसाठी शुभवार्ता आहे, अशी माहिती पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली.

नववर्ष हे लीप वर्ष नसल्याने 365 दिवसांचेच राहणार आहे. 2019 या नूतनवर्षात तीन सूर्यग्रहणे, दोन चंद्रग्रहणे अशी एकूण पाच ग्रहणे होणार असून, त्यापैकी 16 जुलैचं खंडग्रास चंद्रग्रहण आणि 26 डिसेंबरचे कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातून दिसणार असल्याने खगोलप्रेमींसाठी पर्वणी आहे. नऊ वर्षांपूर्वी 15 जानेवारी 2010 रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातून दिसले होते. 11 नोव्हेंबरला होणारे बुधाचे अधिक्रमण भारतातून दिसणार नाही. 21 जानेवारी आणि 19 फेब्रुवारीला सुपरमून दिसणार आहे. नववर्षात ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर वगळता 9 महिने विवाह मुहूर्त असल्याने विवाहोच्छुकांसाठी ही शुभवार्ता आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, लक्ष्मीपूजन आणि ईद-ए-मिलाद हे तीनच उत्सव रविवारी आहेत. तर, उर्वरीत 21 सुट्ट्या या इतर वारी येत असल्यामुळे नवीन वर्षात सुट्ट्यांची चंगळ आहे. वसुबारस आणि धनत्रयोदशी ही एकाच दिवशी 25 ऑक्टोबरला आहे. 27 ऑक्टोबरला नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन तर 28 ऑक्टोबरला पाडवा आणि 29 ऑक्टोबरला भाऊबीज येत असल्याने नववर्षात दिवाळीची मज्जा केवळ चार दिवसांची असेल. तसेच गणेशभक्तांसाठी अंगारकी चतुर्थी मात्र 17 सप्टेंबरला एकच आली आहे, असेही सोमण यांनी सांगितले. 

Web Title: New Year will Come with Holidays and Marriage Events