संघर्ष यात्रेसाठी नितेश राणेंचा पुढाकार

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 11 मे 2017

नारायण राणे यांच्या भूमिकेकडे लक्ष
मुंबई - शेतकरी कर्जमुक्‍तीसाठी विरोधकांनी आयोजित केलेल्या संघर्ष यात्रेच्या चौथ्या टप्प्यात कॉंग्रेस आमदार नितेश राणे यांनी पुढाकार घेतला आहे, त्यामुळे नितेश यांचे पिताश्री नारायण राणे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नारायण राणे यांच्या भूमिकेकडे लक्ष
मुंबई - शेतकरी कर्जमुक्‍तीसाठी विरोधकांनी आयोजित केलेल्या संघर्ष यात्रेच्या चौथ्या टप्प्यात कॉंग्रेस आमदार नितेश राणे यांनी पुढाकार घेतला आहे, त्यामुळे नितेश यांचे पिताश्री नारायण राणे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याबरोबरच त्यांना दिलासा देण्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि अन्य पक्षांनी एकजूट करत राज्यभरात संघर्ष यात्रा काढली आहे. या यात्रेचा चौथा टप्पा येत्या 17 मे पासून कोकणात सुरू होत असून, त्याचा समारोप 18 मे रोजी होणार आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे पक्षात प्रचंड अस्वस्थ असल्याची बाब लपून राहिली नाही, त्यामुळे विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापासूनच सुरू झालेल्या संघर्ष यात्रेकडे त्यांनी ढुंकूनही पाहिले नाही. मध्यतंरी राणे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने जोर धरला होता. याबाबत राणे यांनीही भाजपकडून ऑफर असल्याचे खुलेआम सांगितले होते. राणे यांनी अहमदाबाद येथे भाजप अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामागे राणे यांचा प्रवेश रोखण्यासाठी इच्छुक असलेल्या भाजप नेत्यांचा हात असल्याची चर्चा होती. त्यामुळे राणे यांच्या भाजप प्रवेशाला खीळ बसली. असे असले तरी राणे यांचा कॉंग्रेसवरील राग अद्यापपर्यंत शमला नाही.

ज्या यात्रेत "संघर्ष' नाही, त्यात सहभागी होऊन काय उपयोग, असा सवाल राणे यांनी दोन दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना केला होता. यावरून कोकणात सुरू होणाऱ्या संघर्ष यात्रेकडे ते पाठ फिरवतील असे मानण्यात येते.

दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संघर्ष यात्रेसाठी राणेपुत्र आमदार नितेश राणे यांनी पुढाकार घेतला आहे. त्याबाबत नितेश यांनी माध्यमांकडे आपले मत व्यक्‍त केले आहे. नितेश यांच्या सहभागामुळे राणे कुटुंबातील कॉंग्रेसबाबतच्या वावड्या शांत होतील असे जाणकारांचे मत आहे.

Web Title: nilesh rane Initiative for sangharsh yatra