
NCP : राणेंच्या कानाखाली वाजवा अन् एक लाख रुपये मिळवा; राष्ट्रवादी काँग्रेसची ऑफर
नागपूर : वारंवार शरद पवार यांच्याविषयी अपशब्दात बोलणारे आणि त्यांची औरंगजेबाशी तुलना करणारे माजी खासदार निलेश राणे यांच्या कानाखील वाजवा आणि एक लाख रुपये मिळवा अशी ऑफर नागपूर जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बाबा गुजर यांनी दिली आहे.
निवडणूक जवळ आल्यावर शरद पवार यांना मुस्लीम समाजाचा पुळका येतो. जणू काही औरंगजेबाचा पुनर्जन्म झाल्यासाखरे वाटते अशा आशयाचे वादग्रस्त ट्वीट नीलेश राणे यांनी केले आहे. या ट्विटमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलाच भडका उडाला आहे. याचा निषेधही नोंदवण्यात आला आहे. वायफळ बडबड करणाऱ्या नीलेश राणे यांच्या आता कानाखाली वाजवण्याची वेळ आली असल्याचे सांगून बाबा गुजर यांनी याकरिता एका लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
राज्यातील अनेक शहरांमध्ये जातीय दंगली उफाळून आल्या आहेत. राज्यात शांतता व सलोखा कसा कायम राहील ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी असते. मात्र राणे यात तेल ओतण्याचे काम करीत असल्याचा आरोप गुजर यांनी केला आहे. आमच्या वरिष्ठ नेत्याचा अपमान सहन केला जाणार नाही याची दखल राणे कुटुंबीयांनी घ्यावी असा इशाराही बाबा गुजर यांनी दिला आहे.
कोल्हापूरला कुणीतरी मोबाईलवर पाठविलेला मेसेज चुकीचा असेलही, पण म्हणून लगेच रस्त्यावर उतरून धार्मिक स्वरूप देणे योग्य नाही. आज सत्ताधारी पक्ष अशा गोष्टींना प्रोत्साहित करतो. शांतता आणि सुव्यवस्था ही राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे. राज्यकर्ते आणि त्यांचे सहकारीच रस्त्यावर येऊ लागले व त्यामुळे दोन गटांमध्ये कटुता निर्माण होत असेल तर, ही काही चांगली गोष्ट नाही, असे खडे बोल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सुनावले होते.