esakal | नववी अन्‌ अकरावीची ऑनलाइन परीक्षा ! 5 ते 20 एप्रिलमध्ये परीक्षेचे नियोजन

बोलून बातमी शोधा

30Sakal_Exclusive_44.jpg}

विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे संभाव्य नियोजन... 

  • पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना 'आरटीई'नुसार पुढच्या वर्गात प्रवेश देता येईल 
  • विषय शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वर्गातून करावे अध्यापन; अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या सूचना 
  • नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची घरबसल्या घेता येईल ऑनलाइन परीक्षा 
  • 50 गुणांची असेल वस्तूनिष्ठ प्रश्‍नपत्रिका; प्रत्येक प्रश्‍नपत्रिकेसाठी असेल दीड तासांचा वेळ 
  • 5 ते 20 एप्रिल या काळात नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचे नियोजन
नववी अन्‌ अकरावीची ऑनलाइन परीक्षा ! 5 ते 20 एप्रिलमध्ये परीक्षेचे नियोजन
sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : नववीचे विद्यार्थी पुढच्या वर्षी दहावीत तर अकरावीचे विद्यार्थी बारावीत जाणार आहेत. त्यांना अभ्यासक्रमाची व स्वत:च्या प्रगतीची जाणीव व्हावी, या हेतूने या विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यावीच लागेल, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले. कोरोनाच्या सावटाखाली सुरु झालेल्या शाळांना कोरोना वाढू लागल्याने पुन्हा कुलूप लावावे लागले आहे. या पार्श्‍वभूमीवर आता या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाइन घेण्याच्या दृष्टीने नियोजन सुरु झाले आहे. 5 ते 20 एप्रिल या काळात परीक्षा घेण्याचे नियोजन असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी सकाळशी बोलताना दिली. ऑफलाइन व ऑनलाइन दोन्ही पध्दतीने परीक्षा घेण्याची तयारी मुख्याध्यापकांसह विषय शिक्षकांनी ठेवावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यांची लवकरच कार्यशाळा घेतली जाणार आहे.

मुख्याध्यापकांसह विषय शिक्षकांच्या कार्यशाळा 
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आणि शाळा सुरु करता आल्या नाहीत, तर नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाइन घेतली जाईल. त्यादृष्टीने संबंधित शाळांचे मुख्याध्यापक व विषय शिक्षकांना तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुढील आठवड्यात मुख्याध्यापकांसह विषय शिक्षकांच्या कार्यशाळादेखील घेतल्या जातील. 
- भास्कर बाबर, शिक्षणाधिकारी, माध्यमिक, सोलापूर 

कोरोनामुळे यंदा शाळा 23 नोव्हेंबरपासून सुरु करण्यात आल्या. शाळा बंद असल्याने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम 25 टक्‍के कमी करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला. आता पुन्हा शाळा बंद कराव्या लागल्या, मात्र दहावी, बारावीची परीक्षा एप्रिल- मेमध्ये होणार असल्याने या शाळा बंद करण्यात आलेल्या नाहीत. अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या दृष्टीने शिक्षकांना अध्यापन करावे लागणार आहे. दुसरीकडे नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिकविले जात आहे. या विद्यार्थ्यांना वस्तूनिष्ठ प्रश्‍नपत्रिका देऊन ऑनलाइन परीक्षा घेतली जाणार असून त्यादृष्टीने सर्वच मुख्याध्यापकांसह विषय शिक्षकांना शिक्षणाधिकाऱ्यांनी सूचना केल्या आहेत. त्यासंदर्भात पुढील आठवड्यात कार्यशाळा घेण्याचेही नियोजन सुरु झाले आहे. संबंधित विद्यार्थ्यांना त्या-त्या विषय शिक्षकांच्या माध्यमातून ऑनलाइन परीक्षा पध्दती, प्रश्‍नपत्रिकेचे स्वरुप, यासंदर्भात माहिती दिली जाणार आहे. 

विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे संभाव्य नियोजन... 

  • पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना 'आरटीई'नुसार पुढच्या वर्गात प्रवेश देता येईल 
  • विषय शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वर्गातून करावे अध्यापन; अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या सूचना 
  • नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची घरबसल्या घेता येईल ऑनलाइन परीक्षा 
  • 50 गुणांची असेल वस्तूनिष्ठ प्रश्‍नपत्रिका; प्रत्येक प्रश्‍नपत्रिकेसाठी असेल दीड तासांचा वेळ 
  • 5 ते 20 एप्रिल या काळात नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचे नियोजन