अन्नदात्याने ऊर्जादाते व्हावे ; नितीन गडकरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nitin gadkari

अन्नदात्याने ऊर्जादाते व्हावे ; नितीन गडकरी

पुणे : सोळा लाख कोटींचे इंधन आयात करणाऱ्या या देशातील अन्नदात्या शेतकऱ्यांनी आता ऊर्जादाते व्हावे. शेतकरी उत्पादक कंपन्यांसह शेती क्षेत्राने संघटितपणे जैवइंधन उत्पादन केल्यास किमान पाच लाख कोटी रुपये थेट शेतकऱ्यांकडे जातीलच; पण देशाचा कृषी विकासदर २० टक्क्यांपर्यंत जाईल, असे ठाम प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी केले.

राज्यातील पहिली ‘अॅग्रोवन शेतकरी उत्पादक कंपनी महापरिषद’ (एफपीसी लीडरशिप कॉन्क्लेव्ह) शुक्रवारी पुण्यात पार पडली. या परिषदेचे उद्‌घाटन करताना गडकरी बोलत होते. व्यासपीठावर इस्राईल केमिकल्स लिमिटेडचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुलकर्णी, ‘पारादीप फॉस्फेट’चे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षदीप सिंग, ‘अॅग्रोवन’चे संपादक- संचालक आदिनाथ चव्हाण, ‘सकाळ माध्यम समूहा’चे संपादक संचालक श्रीराम पवार उपस्थित होते.

राज्यभरातील निवडक निमंत्रित शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी अमाप उत्साहात या उपक्रमात सहभागी झाले होते. पारादीप फॉस्फेट्स लिमिटेड हे या उपक्रमाचे टायटल स्पॉन्सरर, तर पॉवर्ड बाय म्हणून इस्राईल केमिकल्स लिमिटेड सहभागी होते. तसेच वर्डेशियन, बँक ऑफ महाराष्ट्र, स्मार्टकेम टेक्नॉलॉजीज लिमिटेड, फिनोलेक्स प्लासॉन इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड आणि राष्ट्रीय केमिकल्स अॅड फर्टिलायझर्स लिमिटेड हे सहप्रायोजक होते.

गडकरी म्हणाले, ‘‘देशभर एफपीसींचा विस्तार होतो आहे; पण सर्वांत चांगले काम महाराष्ट्रात चालू आहे. आता पारंपरिक शेतीच्या चौकटीच्या बाहेर जाऊन विचार करा. आधुनिक युगात ज्ञान व माहिती हेच शेतकऱ्यांच्या समृद्धीचे मुख्य आधार असतील. ‘अॅग्रोवन’च्या माध्यमातून दोन्ही आधार तुमच्यापर्यंत आणले जात आहेत. त्याचा उपयोग नफ्यात करून घ्या. प्रगतीचा हाच मंत्र बी. बी. ठोंबरे, विलास शिंदे यांनी समूहशेतीत जपला आहे. शेतीतील चांगुलपणावर कोणाचेही पेटंट नाही. त्यामुळे जगभर जेथे चांगले चालू आहे त्याचे अनुकरण शेतकऱ्यांनी करावे.’’

टाकाऊ पदार्थांपासून समृद्धी (वेस्ट टू वेल्थ) हा शेतकऱ्यांच्या समृद्धीचा दुसरा मंत्र असेल, असे सांगत गडकरी यांनी, उद्याचा भारतीय शेतकरी ऊर्जादाता असेल, असे स्पष्ट केले. ‘‘ऊर्जानिर्मितीत सर्वाधिक संधी शेतकऱ्यांना राहतील. स्मार्ट व्हिलेजदेखील तयार करता येतील. साखर कारखान्यांना आता बायोसीएनजी सहज तयार करून विकता येईल. त्यावर ट्रॅक्टर चालविल्यास वर्षाकाठी एक लाखाची इंधन बचत होईल. सेंद्रिय टाकाऊ पदार्थांपासून, पाण्यापासून हरित हायड्रोजन तयार होऊ शकतो. शेतकऱ्यांना ऊर्जादाता बनविण्याची ब्ल्यू प्रिंट आता एफपीसींनी तयार करावी,’’ असे आवाहन त्यांनी केले.

आदिनाथ चव्हाण यांनी, देशात सुरू असलेल्या एफपीसी चळवळीचा पाया घालण्याचे काम महाराष्ट्र करीत असून, त्यात खारीचा वाटा ‘अॅग्रोवन’चा आहे, असे प्रास्ताविकात सांगितले. सहकार आणि कॉर्पोरेट यांच्यातील उत्तम बाबींचा मेळ घालून एफपीसींची चळवळ व्यापक करण्याचा प्रयत्न आता अॅग्रोवनच्या महापरिषदेतून होतो आहे, असे श्रीराम पवार यांनी नमूद केले.

‘अॅग्रोवन एफपीसी महापरिषदे’चा शानदार समारोप

अनेक समस्यांशी तोंड देणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपन्यांची (एफपीसी) वाटचाल कठीण आहे. त्यामुळे काही वेळा निराशेशी सामना करावा लागतो. मात्र, समूह शेतीशिवाय देशाच्या कृषी क्षेत्राला पर्याय नसल्याने एफपीसींनी प्रामाणिकपणे धैर्याने लढावे. यात हमखास विजय आपलाच आहे, अशा शब्दात सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर्स कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे यांनी राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींना बळ दिले.‘अॅग्रोवन शेतकरी उत्पादक कंपनी महापरिषदे’च्या (एफपीसी लीडरशिप कॉन्क्लेव्ह) समारोप सोहळ्यात ते बोलत होते. शिंदे यांनी एफपीसींच्या शेतकरी प्रतिनिधींना आव्हाने आणि संधी यांबद्गल माहिती दिली.

‘अॅग्रोवन तुमच्यासोबत’

‘‘एफपीसींनी आता स्वतःची संकेतस्थळे उघडावीत. माहिती व तंत्रज्ञानाचा उपयोग करीत आपल्या शेतीमालाची उत्पादकता वाढवावी. मूल्यसाखळीवर काम करून निर्यातीच्या माध्यमातून डॉलरमध्ये व्यवहार करावेत. त्यामुळे गावात रोजगार तयार होईल. यातून देशाचा विकासदर वाढेल. स्थलांतर थांबेल आणि हे स्वप्न तुमच्या प्रयत्नांमधून साकारल्यास शेतकरी पुन्हा समृद्ध होतील. त्यासाठी सकाळ अॅग्रोवन तुमच्या सोबत आहे,’’ असे गौरवपूर्ण उद्‌गार श्री. गडकरी यांनी काढले. या वेळी उपस्थित एफपीसी प्रतिनिधींनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला.

गडकरींनी ‘एफपीसीं’ना दिलेल्या टिप्स

शेतकऱ्यांना ऊर्जादाता करण्याची ब्ल्यू प्रिंट एफपीसींनी तयार करावी.

टाकाऊ सेंद्रिय पदार्थांपासून इंधननिर्मितीकडे वळावे.

स्मार्ट व्हिलेज तयार करण्यासाठी पुढाकार घ्या.

प्रत्येक गावात एक उत्तम रोपवाटिका तयार करा.

प्रत्येक प्रकल्पात गुणवत्ता अग्रस्थानी ठेवा.

उत्पादन, साठवण, प्रक्रिया, ब्रॅंडिंग, निर्यात अशा पूर्ण साखळीवर कामे करा.

स्वतःची संकेतस्थळे सुरू करून माहितीचे आदानप्रदान करा.

Web Title: Nitin Gadkari Food Should Be Giver Of Energy

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..