भाजपला पर्याय उभारण्याचा नितीशकुमारांचा प्रयत्न

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 23 एप्रिल 2017

कपिल पाटील यांचा लोकभारती पक्ष "जदयू'त विलीन

कपिल पाटील यांचा लोकभारती पक्ष "जदयू'त विलीन
मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीत देशपातळीवर भारतीय जनता पक्षाला एक सक्षम पर्याय उभा करण्याचा प्रयत्न बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार करत आहेत. त्या आधारावर राज्यात भाजपला आव्हान निर्माण करण्यासाठी आणि 2019 मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सर्वसंमतीची एक सक्षम आघाडी उभा केली जात आहे. या हेतूने आमदार कपील पाटील यांना नितीशकुमार यांनी राज्यात धर्मनिरपेक्ष पक्षांचा चेहरा म्हणून समोर आणले आहे. पाटील यांनी लोकभारती हा पक्ष नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलात विलीन केला आहे.

भाजपला देशपातळीवर सध्या सक्षम विरोधी पक्ष म्हणून कॉंग्रेस पर्याय ठरू शकत नाही. त्यामुळे कॉंग्रेससह इतर पक्षांची मोट बांधत 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सक्षम पर्याय उभा करण्याचा नितीशकुमार यांचा मानस आहे. त्या दृष्टिकोनातून नितीशकुमार यांनी राज्यात ही जबाबदारी आमदार पाटील यांच्यावर टाकल्याचे बोलले जाते. धर्मनिरपेक्ष पक्ष एकत्र आल्यानंतर भाजपला हरवणे अवघड नाही, याचा नितीशकुमार व आमदार पाटील यांना विश्‍वास आहे. त्यामुळे 1989 मध्ये ज्याप्रमाणे सर्व धर्मनिरपेक्ष एकत्र आले होते. त्याच धर्तीवरचा प्रयोग आगामी काळात होणार असल्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. विधानसभा तसेच लोकसभा यासाठी एकास एक उमेदवार देताना राज्यातील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस हे पक्ष सोबत आले तर ठिक नाही तर त्यांच्याशिवाय शेतकरी कामगार पक्ष, इतर डावे पक्ष, दलितांचे नेतृत्व करणारे विविध घटक-पक्ष यांना एकाच छताखाली आणण्याचे प्रयत्न नितीशकुमार करतील, अशी अटकळ बांधली जात आहे.

Web Title: nitishkumar trying for bjp option