'माझी कन्या भाग्यश्री'चा वर्षभरात एकही लाभार्थी नाही

- दीपा कदम
रविवार, 5 मार्च 2017

मुंबई - राज्य सरकारने वाजत गाजत जाहीर केलेल्या "माझी कन्या भाग्यश्री' योजनेला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतरही गेल्या वर्षभरात जन्म झालेल्या एकाही कन्येच्या पालकांच्या बॅंकेच्या खात्यावर पाच हजार रुपये जमा झालेले नाहीत. इतकेच नव्हे तर या योजनेसाठी राखून ठेवलेला 25 कोटींचा निधीही वाया जाण्याची शक्‍यता असून, या योजनेचा लाभ मिळावा यासाठी राज्यातून आलेल्या 200 अर्जांना अनाकलनीय नियम आणि अटींमुळे वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत.

महिला व बाल विकास विभागाने स्त्रीभ्रूणहत्या रोखावी, मुलींचा जन्मदर वाढून मुलींच्या जन्माबाबत सकारात्मक विचार केला जावा यासाठी वर्षभरापूर्वी "माझी कन्या भाग्यश्री' योजना जाहीर केली होती. या योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मानंतर पालकांच्या बॅंक खात्यात 5 हजार रुपये जमा केले जाणार, अशी घोषणा महिला व बाल विकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केली होती. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांमध्येही भाजपने या योजनेचा प्रचार करत कौतुक केले. प्रत्यक्षात या योजनेअंतर्गत मुलींच्या जन्मानंतर एकाही पालकाच्या खात्यावर 5 हजार जमा झालेले नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

या योजनेचा लाभ मिळावा यासाठी 200 पेक्षा अधिक अर्ज विविध जिल्हाधिकाऱ्यांकडे आले आहेत. मात्र या योजनेतील क्‍लिष्ट नियम व अटींमुळे ही योजना एकाही जिल्हाधिकाऱ्यांनी राबविली नाही. अर्थसंकल्प फलनिष्पतीचा अहवाल तयार करताना या योजनेचा लाभ किती जणांना झाला आणि किती निधी खर्च झाला हे पाहण्याची वेळ आली तेव्हा या योजनेची कथित "फलनिष्पती' विभागाला स्पष्ट झाली आणि या योजनेअंतर्गत एकालाही या योजनेचा लाभ झाला नसल्याने या योजनेचे 25 कोटी वाया जाणार असल्याचे उघड झाले. त्यानंतर सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी ही योजना राबविण्यास येणाऱ्या तांत्रिक अडचणींची माहिती महिला व बाल विकास विभागाच्या सचिवांना दिल्याने या योजनेचे अधिक स्पष्टीकरण एक वर्षाने देण्याची नामुष्की विभागावर ओढावली आहे.

योजनेतील काही त्रुटी
योजना राबविताना जिल्हाधिकाऱ्यांना आलेल्या अडचणी मूळ योजनेतील त्रुटी आणि अपुरेपणा दाखविण्यास पुरेशा आहेत. पहिल्या मुलीच्या जन्माला 5 हजार रुपये द्यायचे की मुलगी दुसरी असेल तरी 5 हजार द्यायचे किंवा कसे? कितव्या अपत्यानंतर मातेच्या शस्त्रक्रिया नियोजनाचे प्रमाणपत्र आवश्‍यक ठरणार? या योजनेअंतर्गत आजी- आजोबांना 5 हजार रुपयांपर्यंतचे सोन्याचे नाणे दिले जाणार आहे. पण आजी- आजोबा म्हणजे कन्येच्या वडिलांचे की आईचे, अशा प्रकारच्या अनेक त्रुटी या योजनेत असल्याने या योजनेची अंमलबजावणी अद्याप करण्यात आली नसल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

Web Title: no beneficiary for majhi kanya bhagyashri