भ्रष्टाचार थांबविण्याची सरकारची इच्छाच नाही - अण्णा हजारे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 मार्च 2017

राळेगणसिद्धी - "लोकसभेत विरोधी पक्षनेता नसल्याने लोकपाल व लोकायुक्ताची नेमणूक करता येत नसल्याचे सरकार सांगत असेल, तर केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) प्रमुखाची नेमणूक कशी केली?', असा प्रश्‍न उपस्थित करत लोकपाल कायदा करण्याची आणि भ्रष्टाचार थांबविण्याची सरकारची इच्छाच नाही, असा आरोप ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला. सरकारच्या विरोधात लवकरच रामलीला मैदानावर आंदोलन करणार असल्याचे त्यांनी या वेळी जाहीर केले.

लोकपाल व लोकायुक्त नेमणुकीबाबत पंतप्रधानांना पाठविलेल्या एका पत्राचे उत्तर हजारे यांना नुकतेच मिळाले. त्या पार्श्‍वभूमीवर ते म्हणाले, ""या पत्रात सरकारने, लोकपाल नियुक्तीच्या समितीत पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेते सदस्य आहेत. सध्या लोकसभेत विरोधी पक्षनेता नसल्याने ही नियुक्ती करता येत नसल्याचे म्हटले आहे.

"सीबीआय'प्रमुखाच्या नेमणुकीसाठीच्या समितीतही विरोधी पक्षनेता सदस्य असतो. मग त्यांची नेमणूक कशी झाली? लोकपाल नेमणुकीस केंद्रास ही अडचण आहे, तर राज्यात लोकायुक्त का नेमला नाही? निदान भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या राज्यात तरी या नियुक्‍त्या होणे गरजेचे होते.''

"भाजपचे सरकार सत्तेवर येऊन तीन वर्षे झाली तरी, भ्रष्टाचार कमी झाला नाही. याचा अर्थ या सरकारला भ्रष्टाचार कमी करण्याची इच्छा नाही,' अशी थेट टीका करून हजारे म्हणाले, 'अनेक वर्षांपासून सरकारी कार्यालयात पैसे दिल्याशिवाय कोणतेच काम होत नाही. ही स्थिती आजही बदललेली नाही. रामलीला मैदानावर केलेल्या आंदोलनाचा परिणाम म्हणून 2011मध्ये लोकपाल आणि लोकायुक्त कायदा संसदेने मंजूर केला. मात्र, सरकारने त्याची अंमलबजावणी केली नाही. हा संसद आणि जनतेचा अपमान आहे.''

'मोदी यांनी निवडणूक प्रचारात भ्रष्टाचार कमी करण्याचे आश्‍वासन दिले होते. ते फक्त बोलतात; प्रत्यक्षात कृती करीत नाहीत. मी तीन वर्षे सरकारच्या विरोधात बोललो नाही. आता माझे मन सांगत आहे की, देशाच्या हितासाठी पुन्हा एकदा रामलीला मैदानावर आंदोलन करावे लागेल. त्याची तारीख मी लवकरच जाहीर करीन,'' असे त्यांनी सांगितले.
 

नवे "फेसबुक पेज'
कार्यकर्त्यांना संपर्क साधता यावा यासाठी नवे "फेसबुक पेज' सुरू केल्याचे सांगून अण्णा हजारे म्हणाले, 'इच्छुकांनी www.facebook.com/k.B.Annahazare येथे संपर्क साधावा. या "फेसबुक पेज'ला आतापर्यंत 14 लाख जणांनी भेट दिली. माझ्या यापूर्वीच्या "फेसबुक पेज'चा राजकीय लोकांनी गैरवापर केल्याने आता हे नवे "पेज' सुरू केले आहे.''

Web Title: No desire to stop government corruption