Loksabha 2019 : पक्ष सोडलेल्या नेत्यांना 'राष्ट्रवादी'ची दारे कायमची बंद!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 एप्रिल 2019

कठीण परिस्थितीत पक्षाला सोडून सत्तेच्या आसऱ्याला गेलेल्या नेत्यांचे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये परतण्याचे दोर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कापले आहेत.

मुंबई : कठीण परिस्थितीत पक्षाला सोडून सत्तेच्या आसऱ्याला गेलेल्या नेत्यांचे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये परतण्याचे दोर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कापले आहेत. पंढरपूरमध्ये आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचार सभेत शुक्रवारी बोलताना पवार म्हणाले की, पक्ष सोडून गेलेल्यांची अंडीपिल्ली मला माहीत आहे. त्यामुळे त्यांची परतीची दारे कायमची बंद झाली आहेत. 

1999 पासून 2014 पर्यंत राज्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता होती. या सत्तेचा वाटा सर्वांपर्यंत पोहचविण्याची काळजी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांनी घेतली होती. अनेकांना पवार कुटुंबीयांनीच राजकीय आणि सामाजिक स्थैर्य मिळवून दिल्याची सल अजित पवार यांना सतावत आहे.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत "राष्ट्रवादी'सह कॉंग्रेसचाही दारुण पराभव झाला होता. त्यानंतर चार-पाच महिन्यांतच झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान अनेक नेत्यांनी भाजपमध्ये आसरा घेतला. राज्यात सत्तांतर झाल्यानंतरही पक्षातील ही गळती काल-परवापर्यंत कायम होती. 

बीडचे आमदार आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी शुक्रवारी (ता. 6) राष्ट्रवादीला सोडचिठी देत लोकसभा निवडणुकीत भाजपला मदत करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. एका बाजूला लोकसभा निवडणुकीत कडवी झुंज सुरू असताना पक्षाचे नेते मात्र सोडून जात असल्याची सल राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांना सतावते आहे.

दुसरीकडे, शरद पवार यांनी यंदा प्रथमच लोकसभा निवडणुकीत तरुणांना संधी देत जुन्यांमुळे पक्षाचे काहीही अडत नसल्याचा संदेश दिला आहे. मावळमधून पार्थ पवार, नगरमध्ये संग्राम जगताप, बीडमध्ये बजरंग सोनवणे, माढ्यातून संजय शिंदे, परभणीतून रमेश विटेकर, उस्मानाबादमधून राणा जगजितसिंह पाटील, शिरूरमधून डॉ. अमोल कोल्हे, दिंडोरीतून धनराज पाटील या तरुण नेत्यांना लोकसभेच्या मैदानात उतरविले आहे. 
देशात आणि राज्यात भाजप सरकारच्या विरोधात वातावरण असल्याने यंदा कॉंग्रेस आघाडीसाठी अनुकूल वातावरण तयार झाल्याचे मानण्यात येते.

केंद्रात मोदी सरकारचा पराभव झाला, तर राज्यातही सत्ताबदल होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. अशा वेळी पक्षातून गेलेले नेते पुन्हा परत येणार असले, तरी त्यांच्यासाठी परतीचे दोर अजित पवार यांनी कापले आहेत. 

पक्ष सोडून गेलेले कोण आहेत नेते...

माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, बबनराव पाचपुते, डॉ. विजयकुमार गावित, आमदार सुरेश धस, किसन कथोरे, शिवाजी कर्डिले, प्रशांत परिचारक, प्रसाद लाड, माजी राज्यमंत्री संजय सावकारे, भाजप खासदार संजयकाका पाटील, भारती पवार. 

Web Title: No Entry again in NCP Party to Leaders who Left NCP