कर्जमाफीची गरज नाही? सेना भाजप आमनेसामने

ब्रह्मदेव चट्टे
बुधवार, 5 एप्रिल 2017

सेनेचे आमदार प्रशांत बंब यांना मारतील की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी शिवसेनेचे राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी सेनेच्या आमदारांना रोखून धरले. 

मुंबई : विधानसभेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची गरज नसल्याचे भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी सांगताच शिवसेनेचे आमदार चांगलेच आक्रमक झाले. विधानसभेत आज शिवसेना भाजपचे आमदार एकमेकाविरोधात चांगलेच भिडले. 

आमदार प्रशांत बंब विधानसभेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून चर्चा करताना म्हणाले, "मी म्हणतोय त्याला अनेकजणांचा विरोध होईल. तरीही मी सांगतो शेतकऱ्यांना कर्जमाफी नको, शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज नाही." 
बंब यांनी असे सांगताच सेनेचे आमदार चांगलेच आक्रमक झाले. यावेळी विधानसभेत सेनेचे आमदार प्रशांत बंब यांनी उद्देशून जाब विचारू लागले. भाजप आमदार प्रशांत बंब गोंधळातच "मला माझे म्हणणे मांडू द्या, मला बोलू द्या, अध्यक्ष महोदय मला संरक्षण द्या" म्हणत अध्यक्षांकडे बोलण्याची मागणी करत उभे राहिले होते. सेनेचे आमदार शंभूराजे देसाई, सुनील प्रभू, सुभाष साबणे यांच्यासह सेनेचे आमदार चांगलेच आक्रमक झाले होते. आमदार प्रशांत बंब यांचे 'कर्जमाफी नको हे विधान शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे' असल्याचे सांगत शिवसेनेचे आमदार आक्रमक झाले. बंब यांच्या जवळ जाऊन 'शेतकऱ्यांना कर्जमाफी का नाही?' असा जाब विचारू लागले. 

यावेळी भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी आमदार प्रशांत बंब यांच्याजवळ येत सेनेच्या आमदारांना शांत करण्याचा प्रयत्न केला. चांगलीच हमरी-तुमरीची वेळ आली होती. सेनेचे आमदार प्रशांत बंब यांना मारतील की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी शिवसेनेचे राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी सेनेच्या आमदारांना रोखून धरले. 

गोंधळ वाढत असल्याचे बघून भाजपचे प्रतोद राज पुरोहित ही प्रशांत बंब यांच्या संरक्षण करण्यास धावले. गोंधळ वाढल्याने अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी गप्प बसण्याचे आदेश दिले.
 

Web Title: no need of loan waiver to farmers, says bjp leader