राजीनाम्याची गरज नाही, कामे जनतेपर्यंत पोचवा 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

मुंबई - ""तुम्ही भाजपचे आमदार आहात. मराठा आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर कोणीही राजीनामा देण्याची गरज नाही. मराठा समाजाबाबत सरकार प्रामाणिकपणे काम करीत आहे. हा संदेश आपापल्या मतदारसंघात पोचवा,'' अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भाजपच्या आमदारांच्या बैठकीत दिला. 

मुंबई - ""तुम्ही भाजपचे आमदार आहात. मराठा आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर कोणीही राजीनामा देण्याची गरज नाही. मराठा समाजाबाबत सरकार प्रामाणिकपणे काम करीत आहे. हा संदेश आपापल्या मतदारसंघात पोचवा,'' अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भाजपच्या आमदारांच्या बैठकीत दिला. 

राज्यात उसळलेल्या मराठा आंदोलनाचे आव्हान आवासून उभे असताना भाजपच्या आमदारांची बैठक मुख्यमंत्री फडणवीस यांनी दादर येथील पक्षाच्या वसंत स्मृती कार्यालयात बोलावली होती. ही बैठक सुमारे दीड तास चालली. या बैठकीला सुमारे 70 च्या आसपास आमदार आणि काही मंत्री उपस्थित होते. तसेच राष्ट्रीय संघटक व्ही. सतीश, राज्यसंघटक विजय पुराणिक हे या वेळी उपस्थित होते. या बैठकीनंतर शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना माध्यमांच्या प्रतिनिधींना सामोरे जावे लागले. 

आंदोलनाच्या झळा तीव्र झाल्यावर त्याचा राजकीय फटका बसू नये, म्हणून सर्व राजकीय पक्षांनी आपापल्या आमदारांच्या बैठका बोलावल्या होत्या. सत्ताधारी भाजपच्या आमदारांची बैठक अशी बैठक झाली नव्हती. मराठा आंदोलनाविषयी आमदारांच्या काय भावना आहेत. हे जाणून घेण्यासाठी ही बैठक होती. या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमदारांना मार्गदर्शन केले. मराठा आंदोलनाची धग शांत करण्यासाठी प्रत्येक आमदाराने प्रयत्न करावेत. यासाठी पक्षाने आतापर्यंत केलेली कामे जनतेपर्यंत पोचवा. तसेच कोणीही राजीनामा देण्याची गरज नाही. सरकार प्रामाणिक प्रयत्न करीत आहे, हे जनतेपर्यंत पोचवा, असे मुख्यमंत्री म्हणाले. 

""मराठा आमदारांनी मराठा आंदोलनावरून आक्रमक होण्याची गरज नाही. तसेच स्वतः आंदोलनात सहभागी होण्याची गरज नाही,'' असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितल्याचे समजते. यानंतर पत्रकार परिषदेत तावडे यांनी सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक असल्याचे सांगितले. 

Web Title: No need to resign says CM