रावसाहेबांना उपरती!

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 12 मे 2017

संतप्त पडसादानंतर दानवे यांची सारवासारव

संतप्त पडसादानंतर दानवे यांची सारवासारव
मुंबई - शेतकऱ्यांबद्दल काढलेल्या अपशब्दांचे तीव्र पडसाद राज्यभरात आज उमटताच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना उपरती झाली आणि "मी शेतकऱ्यांना उद्देशून कोणताही अपशब्द वापरला नाही, तरीही मी दिलगिरी व्यक्त करतो,' अशा शब्दांत सारवासारव करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. सत्ताधारी शिवसेनेसह कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेससह राजकीय पक्षांनी आणि शेतकऱ्यांनीही दानवे यांच्या विधानाचा निषेध केला. एवढेच नव्हे, तर सोशल मीडियावरही वेगळा "ट्रेंड' चालवून नेटिझन्सनी दानवे यांना अक्षरशः लाखोली वाहिली.

"एवढी तूर खरेदी केली, तरी रडतातXX,' असे विधान दानवे यांनी काल जालन्यात केले होते. त्याचे संतप्त पडसाद आज राज्यभरात उमटले. नागपूर, अकोला, औरंगाबाद, नांदेड, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, जळगाव, सातारा, नगर आणि पुणे अशा मोठ्या शहरांत राजकीय पक्षांनी निदर्शने करून दानवे यांच्या विधानाबद्दल संताप व्यक्त केला. नाशिकमध्ये दानवे यांच्या छायाचित्राला जोडे मारण्याचे आंदोलन करण्यात आले. या पडसादानंतर दानवे यांनी एक प्रसिद्धीपत्रक काढून दिलगिरी व्यक्त करत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.

शिवसेनेचे "जोडे मारो' आंदोलन
दानवे यांच्या विरोधात राज्यभरात संताप व्यक्त होत होता, तसेच निदर्शने सुरू होती. शिवसेनेने "जोडे मारो' आंदोलन करीत दानवे यांच्या शेतकरीविरोधी वक्‍तव्याचा समाचार घेतला, तर सोशल मीडियात स्वतंत्रपणे "ट्रेंड' चालवित नेटिझन्सनी दानवे यांना अक्षरशः दानवे यांना लाखोली वाहिली. विरोधी पक्षानेही दानवे यांच्याबाबत तीव्र संताप व्यक्‍त करीत भाजपने त्यांची हकालपट्‌टी करावी, अशी मागणी केली. राज्यभरातील शेतकऱ्यांनीही दानवे यांच्या वक्‍तव्याचा निषेध केला.

दानवे यांच्या वक्‍तव्यातील शब्द पकडून सोशल मीडियावर आज दिवसभर ट्रेंड सुरू होता. फेसबुक व ट्‌विटरवर दानवे यांच्या वक्‍तव्याचा जोरदार निषेध सुरू असतानाच भाजपची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू होते. आजपर्यंत कायम भाजप समर्थकांचा सोशल मीडियातला "ट्रेंड' उच्चांक गाठत असताना दानवे यांच्या विरोधातील "ट्रेंड'वरून मात्र भाजप व समर्थक बॅकफूटवर गेल्याचे दिसत होते. दानवे यांचा निषेध करणाऱ्या चारोळ्या, कविता, भावना, भूमिका व काही व्यंग्यचित्रांनी शेतकऱ्यांची बाजू उचलून धरली होती. भाजप नेते व कार्यकर्त्यांचीही याविषयी बोलण्यास अडचण होत होती.

शिवसेना कार्यकर्त्यांनी आज सकाळपासून राज्यभरात दानवे यांच्या पुतळ्यांचे दहन केले. "जोडे मारो' आंदोलन करत रोष व्यक्‍त केला. बळिराजाला शिवीगाळ करणाऱ्या पक्षाला व नेत्याला जनता धडा शिकवेल, असा सूर या सर्व आंदोलनांतून दिसत होता.

ही भाषा "दानवा'सारखी
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दानवे यांची भाषा "दानवा'सारखी असल्याची टीका केली. कॉंग्रेस दानवे यांच्या विरोधात राज्यभर आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी या वेळी दिला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही दानवे यांच्या वक्‍तव्यावर संताप व्यक्‍त करताना, ही सत्तेची मस्ती असल्याची टीका केली. भाजपचा शेतकरीविरोधी चेहरा समोर आला असून, दानवे यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार उरलेला नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. "प्रहार' संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी तर दानवे यांच्या तोंडाला काळे फासणार असल्याचा इशारा दिला आहे.

दानवे यांचा खुलासा
माध्यमांना पाठवलेल्या प्रसिद्धिपत्रकात दानवे म्हणतात, की दहा मे रोजी भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक जालना भाजप कार्यालयात बोलावण्यात आली होती. या बैठकीत प्रामुख्याने पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती वर्षानिमित्त एक वर्ष, सहा महिने व पंधरा दिवस असे विस्तारक, ज्यांनी दिलेल्या दिवसांचा संपूर्ण वेळ पक्षासाठी द्यायचा, यांची बैठक होती. या बैठकीमध्ये ग्रामीण भागात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणे व तो शेतात जाऊन साधणे, अशा प्रकारची चर्चा झाली. यासाठी बैठकीमध्ये तीन वर्षांची केंद्र सरकारची कामगिरी व अडीच वर्षांची राज्य सरकारची कामगिरी हेच विषय बैठकीत घ्यावेत, अशा सूचना दिल्या होत्या. परंतु, एका कार्यकर्त्याकडून तुरीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यावर तुरीच्या संदर्भात सरकारची भूमिका मी त्यांना समजावून सांगितली आणि पुन्हा केंद्राने एक लाख टन तूर खरेदीसाठी मान्यता दिल्याचे सांगितले. हे कार्यकर्त्यांना समजावून सांगितले. माझा आणि कार्यकर्त्यांचा हा संवाद आहे. यामध्ये मी शेतकऱ्यांना उद्देशून कोणताही अपशब्द वापरला नाही. मी स्वतः शेतकऱ्यापोटी जन्म घेतला आहे. शेतकऱ्यांचे दु:ख मला माहिती आहे. शेतकऱ्यांची बाजू घेत सतत 35 वर्षे मी राजकारणात आहे. त्यामुळे मी शेतकऱ्यांबद्दल कधीही अपशब्द वापरू शकत नाही. माझ्या आणि कार्यकर्त्यांच्या संवादाला शेतकऱ्यांशी जोडू नये. परंतु, याउपरही शेतकऱ्यांची मने दुखावली गेली असतील, तर मी दिलगिरी व्यक्त करतो.

दानवे आता काय उपयोग? निघालेला शब्द आणि सोडलेला बाण परत थोडीच येणार?
- ज्योत्स्ना ठाकूर, वाचक
Web Title: No objection is taken against the farmers