अतिवृष्टीचा एकाही जिल्ह्याचा पूर्ण नाही पंचनामा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले; तर कापूस, भात, मका, बाजरी, उडीद, सोयाबीनही काळवंडले. मात्र, अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे लाखो शेतकरी पंचनाम्याची वाट पाहत असून, अद्याप एकाही जिल्ह्याचा पंचनामा पूर्ण झालेला नाही

सोलापूर - राज्यातील १८ जिल्ह्यांतील अतिवृष्टीने ५४ लाख हेक्‍टरवरील पिकांचे तब्बल ३५ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास अवेळी बरसलेल्या पावसाने हिरावला. 

फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले; तर कापूस, भात, मका, बाजरी, उडीद, सोयाबीनही काळवंडले. मात्र, अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे लाखो शेतकरी पंचनाम्याची वाट पाहत असून, अद्याप एकाही जिल्ह्याचा पंचनामा पूर्ण झालेला नाही. दुसरीकडे, सत्तासंघर्षामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई कधीपर्यंत मिळेल, याबाबत अधिकारीही अनुत्तरित झाले आहेत. मॉन्सून परतल्यानंतर अपेक्षित नसतानाही अचानकपणे कोसळलेल्या वरुणराजाने बळिराजाच्या स्वप्नांचा चुराडा केला. सोलापूर, नाशिक, परभणी, नांदेड, अकोला, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, नगर, सातारा, पुणे, यवतमाळ या जिल्ह्यांतील पिकांना सर्वाधिक फटका बसला. आत्तापर्यंत नैसर्गिक आपत्तीत एवढे नुकसान झाले नव्हते तितके नुकसान या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याला सोसावे लागले.

मागील वर्षीच्या दुष्काळातून मार्ग काढत यशस्वी वाटचाल करणारा बळिराजा अतिवृष्टीने हवालदिल झाला आहे. पंचनाम्याचे अहवाल ६ नोव्हेंबरपर्यंत सादर करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. कर्मचाऱ्यांअभावी पंचनामे २०पर्यंत पूर्ण करण्याच्या अंतर्गत सूचना असल्याने अधिकारी सवडीने पंचनामे करीत असल्याचे मदत व पुनवर्सन विभागातील सूत्रांनी  सांगितले.

अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना लवकर भरपाई मिळावी म्हणून नुकसानीचे पंचनामे तत्काळ करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, पाऊस खूप झाल्याने पंचनामे करण्यात अडचणी येत होत्या.
- नारायण शिसोदे, संचालक, कृषी

अतिवृष्टीने झालेले नुकसान
    डाळिंब बागा : ३,५०० कोटी 
    सीताफळ : ४३० कोटी 
    द्राक्ष बागा : ९,००० कोटी 
    कापूस : ११,००० कोटी 
    भात अन्‌ मका : ९०० कोटी 
    बाजरी, कांदा : २,७०० कोटी 
    सोयाबीनसह अन्य पिके : ६,४०० कोटी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No one district inspection has been completed due to heavy rainfall